सारे गाव हळहळले, दोन सख्ख्या बहिणींचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार, विहिरीत बुडून झाला होता मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 12:39 PM2022-03-17T12:39:20+5:302022-03-17T12:40:04+5:30
दोन्ही सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली होती.
भालकी (जि. बीदर) : भालकी तालुक्यातील आट्टरगा गावात दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत अंकिता गोविंदराव मोरे (१३), श्रध्दा गोविंदराव मोरे (१५) यांचा मृत्यू झाला आहे.
मुलींची आई शेताकडे गेली असता तिला विहिरीच्या वरच्या बाजूस मुलींच्या चपला आणि ओढणी दिसली. तेव्हा शोधाशोध केली, परंतु मुली कुठे आढळून आल्या नाहीत. ही माहिती कुटुंबीयांना कळविल्यावर गावातील लोक धावत आले. रात्री १० वाजण्याच्या सुमारास दोन्ही बहिणींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. भालकी येथील शासकीय रुग्णालयात दोन्ही मयतांचे शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी भालकीचे पोलीस उपाधीक्षक जेम्स मॉनिजेस, सर्कल इन्स्पेक्टर वीरना दोडमनी, मेहकरचे पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत कारंजे यांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एकाच चितेवर दोघींचे अंत्यसंस्कार...
दोन्ही सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली होती. दरम्यान, शवविच्छेदन झाल्यावर प्रेत नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आले. बुधवारी दुपारी दोन्ही बहिणींचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, एक भाऊ, आजी असा परिवार आहे.