पत्नीने अल्पवयीन प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून
By हरी मोकाशे | Published: January 7, 2024 07:59 PM2024-01-07T19:59:25+5:302024-01-07T19:59:36+5:30
पोलिस तपासात उलगडले हत्येचे कारण.
लातूर : रेणापूर तालुक्यातील डिगोळ देशमुख येथून बेपत्ता झालेल्या विवाहित ३४ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह शनिवारी आढळला होता. शरीरावरील जखमा पाहून पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता पत्नीने अल्पवयीन प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे रविवारी निष्पन्न झाले आहे.
वैभव ज्योतिराम निकम (३४, रा. डिगोळ देशमुख, ता. रेणापूर) असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, वैभव ज्योतिराम निकम हा टेम्पोचालक होता. तो पत्नी नेहा व एक मुलगा, मुलीसह राहत होता. दरम्यान, २ जानेवारीपासून तो बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. परंतु, तो सापडला नाही. त्यामुळे भाऊ सुरज ज्योतिराम निकम यांनी शुक्रवारी रेणापूर पोलिसांत बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती.
शनिवारी शिवारातील श्रीराम पवार यांच्या शेतालगतच्या बराशित वैभव निकम यांचा मृतदेह आढळून आला. पोलिस निरीक्षक अशोक अनंत्रे, जमादार एस. व्ही. शेंबाळे, व्ही. एस. मागडगे यांनी पंचनामा केला. दरम्यान, घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. अंत्यविधीनंतर मयताचा भाऊ सुरज यांनी भावजयीस तिच्या अल्पवयीन प्रियकरासोबत पाहिले होते. त्यामुळे अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याने त्या दोघांनी भावाचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांनी रक्ताने माखलेली गोधडी घराच्या पाठीमागे जाळून टाकली, अशा आशयाची फिर्याद रेणापूर पोलिसांत दिली. त्यावरुन विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
पत्नीने दिली खूनाची कबुली...
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मयताची पत्नी नेहा वैभव निकम हिच्याकडे कसून चौकशी केली. तेव्हा मी व अल्पवयीन प्रियकराने मिळून पतीचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी मयताची पत्नी आरोपी नेहा व तिच्या अल्पवयीन प्रियकरास ताब्यात घेतले आहे.