टेम्पो पाठीमागे घेताना महिला चिरडली; संतप्त गावकऱ्यांनी रोखला रस्ता
By हरी मोकाशे | Published: December 16, 2022 05:28 PM2022-12-16T17:28:59+5:302022-12-16T17:29:24+5:30
लातूर- अंबाजोगाई महामार्गावरील कोळगाव तांड्याजवळ टेम्पो पाठीमागे घेताना एका महिलेचा चिरडून जागीच मृत्यू झाला.
लातूर :
लातूर- अंबाजोगाई महामार्गावरील कोळगाव तांड्याजवळ टेम्पो पाठीमागे घेताना एका महिलेचा चिरडून जागीच मृत्यू झाला. त्यामुळे तांड्यावरील संतप्त नागरिकांनी महामार्ग अर्धातास रोखून धरला होता. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वा. च्या सुमारास घडली.
शांताबाई रतन राठोड (५५, रा. कोळगाव तांडा, ता. रेणापूर) असे मयत महिलेचे नाव आहे. लातूर- अंबाजोगाई महामार्गावरील कोळगाव तांड्याकडे शांताबाई रतन राठोड ही महिला शुक्रवारी दुपारी डोक्यावर गवताचा भारा घेऊन येत होती. तेव्हा तेव्हा लातूरहून अंबाजोगाईकडे टेम्पो (एमएच १६, क्यू २२९६) हा जात होता. दरम्यान, याच मार्गावर पलिकडील बाजूस वाहतूक पोलीस अधिक प्रमाणात मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत होते. पोलिसांनी या टेम्पोस थांबविले. तेव्हा चालकाने पुढे गेलेला टेम्पो मागे घेत असताना सदरील महिलेस पाठीमागून धक्का बसला. त्यामुळे ती पडली आणि काही क्षणातच तिच्या अंगावरुन टेम्पो गेल्याने चिरडली.
या घटनेची माहिती मिळताच कोळगाव तांड्यावरील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान, रेणापूर ठाण्याचे पोनि. दीपक शिंदे, कर्मचारी बाळासाहेब कन्हेरे, गौतम कांबळे आदी घटनास्थळी दाखल झाले. ज्यांच्यामुळे ही घडली, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करीत कोळगाव तांड्यावरील नागरिकांनी अर्धा तास महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होते. सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.
वाहतूक पोलिसांमुळे अपघात झाल्याचा आरोप...
महामार्गावर वाहन तपासणी व कारवाईसाठी वाहतूक पोलीस होते. त्यांनी टेम्पोस थांबविले. त्यामुळे चालकाने टेम्पो पाठीमागे घेताना ही घटना घडली. वाहतूक पोलिसांमुळे ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी करुन कारवाई करावी म्हणून रस्तारोको केला.
दोषींवर कठोर कारवाई...
अपघाचा संपूर्ण घटनाक्रम तपासून दोषींवर कारवाई केली जाईल, असे सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी ग्रामस्थांना सांगितले. वाहतूक पोलिसांची व्हॅन व ते कर्मचारी सध्या रेणापूर ठाण्यात आहेत, असे सांगितले.