ऐन पावसाळ्यात काढले पुलाचे काम, दमदार पावसाने तेरू नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून
By संदीप शिंदे | Published: July 22, 2024 06:47 PM2024-07-22T18:47:12+5:302024-07-22T18:47:35+5:30
पर्यायी पूल वाहून गेल्याने बाराहाळी, मुखेड, तसेच लातूर-नांदेड जिल्हा सरहद्दीवरील गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
अतनूर ( लातूर) : येथील तेरू नदीवर पुलाचे काम सुरू असल्याने तयार करण्यात आलेला पर्यायी पूल पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे अतनूरसह गव्हाण, मेवापूर, चिंचोली, गुत्ती, घोणसी, नळगीर, उदगीरला जाणाऱ्या काही गावांचा संपर्क तुटला आहे.
पर्यायी पूल वाहून गेल्याने बाराहाळी, मुखेड, तसेच लातूर-नांदेड जिल्हा सरहद्दीवरील गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. दुचाकी, चारचाकी वाहन व एसटी बस वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अतनूर तेरू नदीचे पात्र दीडशे वर्षांपूर्वीपासूनचे असून, यामध्ये बारमाही पाणी वाहत असते. असे असतानाही नवीन पूल एक वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला. ठेकेदाराने ऐन पावसाळ्यात काम सुरू केले आहे. त्यामुळे तयार केलेला पर्यायी पूल वाहून गेला आहे. त्यामुळे त्वरित पर्यायी रस्ता उपलब्ध करावा, अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा अतनूरसह परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.