बैल धुण्यासाठी गेलेला युवक तलावात बेपत्ता, उदगीरच्या अग्निशामक दलाकडून शोधकार्य सुरू
By आशपाक पठाण | Published: September 15, 2023 01:07 AM2023-09-15T01:07:27+5:302023-09-15T01:08:45+5:30
अग्निशामक दलाच्या पथकाकडून शोधकार्य सुरू असल्याचे वाढवणा पोलिसांनी सांगितले.
उदगीर : तालुक्यातील चोंडी शिवारील एका पाझर तलावात गुरुवारी सकाळी पोळा सणानिमीत्त बैल धुण्यासाठी गेलेला १६ वर्षीय युवक तलावात बुडाल्याची घटना घडली. गुरुवारी रात्री ११ वाजेपर्यंत तलावात बुडालेला तो युवक सापडला नव्हता. अग्निशामक दलाच्या पथकाकडून शोधकार्य सुरू असल्याचे वाढवणा पोलिसांनी सांगितले.
चोंडी येथील विकास रमेश कांबळे (वय १६) हा गावाजवळ असलेल्या पाझर तलावात बैल धुण्यासाठी गेला होता. तो त्या पाझर तलावाच्या पाण्यात बुडाल्याची माहिती प्रशासनाला समजल्यानंतर घटनास्थळी उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे, वाढवणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड, पोलीस हवालदार एस. डी. सोनवणे, इकराम उजेडे , संजय कलकत्ते घटनास्थळी दाखल झाले. गावातील नागरिकांनी पाझर तलावातील पाण्यात बुडालेल्या त्या युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो युवक मिळून आला नाही. तेव्हा उदगीर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. दरम्यान पाण्यात बुडालेल्या त्या युवकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.