महाराष्ट्रव्यापी नाट्य जागर; शंभरावे नाट्यसंमेलन लातुरात रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 12:15 PM2020-03-09T12:15:29+5:302020-03-09T12:19:35+5:30
लातुरात प्रथमच नाट्यसंमेलन होत असून त्याचे आयोजन नाट्यपरिषदेची लातूर महानगर शाखा करीत आहे.
लातूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने यंदा लातुरात ४ ते १० मे या कालावधीत १०० वे नाट्यसंमेलन होणार आहे़ यानिमित्त महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांत नाट्य जागर होणार आहे़ मराठी नाटक आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचा नाट्य परिषदेचा मानस असल्याचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, कार्यवाह शरद पोंक्षे यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत दिली़
प्रसाद कांबळी म्हणाले, लातुरात प्रथमच नाट्यसंमेलन होत असून त्याचे आयोजन नाट्यपरिषदेची लातूर महानगर शाखा करीत आहे. ४ ते १० मे या कालावधीत लातूर शहरासह उदगीर, अहमदपूर आणि निलंगा या तालुक्यांच्या ठिकाणी ४ दिवस नाट्यजागर होईल. यात नामवंत कलावंतांचा सहभाग असेल़ यात चार व्यावसायिक नाटके सादर होतील. ८ मे रोजी लातूर शहरातून नाट्यदिंडी काढून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन होईल. ९ मे रोजी स्थानिक नाट्य कलावंतांच्या विविध नाट्यकला प्रकारांचे सादरीकरण होईल. १० मे रोजी मध्यवर्तीकडून येणारे विविध नाटके, दिर्घांक एकांकिका, नाट्यरजनी या विषयांवर परिसंवाद, चर्चासत्र होईल़. नाट्यसंमेलनास महाराष्ट्रातील किमान २०० नाट्य कलावंत तथा रंगकर्मी हजेरी लावणार आहेत़ पत्रपरिषदेला लातूर महानगर शाखेचे अध्यक्ष अॅड़ शैलेश गोजमगुंडे, दिगंबर प्रभू आदींची उपस्थिती होती.
मुंबईत होणार समारोप
शंभराव्या नाट्य संमेलनाचा जागर २७ मार्चपासून सांगली येथून सुरू होईल़ महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांत नाट्यजागर पोहोचेल़ त्यानंतर ४ ते १० मे या कालावधीत लातूर येथे हे संमेलन होईल़ संमेलनाचा समारोप मुंबई येथे होईल, अशी माहिती प्रसाद कांबळी, सिनेअभिनेते शरद पोंक्षे यांनी दिली़