भररस्त्यात महिलेला लुबाडणारा पाेलिसांच्या जाळ्यात; दुचाकीसह साेन्याचे दागिने जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: April 5, 2023 06:54 PM2023-04-05T18:54:15+5:302023-04-05T18:54:26+5:30
सीसीटीव्ही फुटेजच्या पाहणीतून मिळालेल्या माहितीवरून लागला शोध
लातूर : एका ३० ते ३५ वर्षीय महिलेला निलंगा ते नणंद मार्गावर लुबाडत साेन्याचे दागिने, राेख रक्कम हिसकावून आराेपीने दुचाकीवरून पळ काढल्याची घटना निलंगा येथे ३१ मार्च राेजी घडली होती. याबाबत निलंगा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, निलंगा पाेलिसांनी बीदर राेडवर आराेपीच्या मुसक्या आवळत दुचाकीसह त्याला अटक केली.
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले हाेते. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, निलंगा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांच्या पथकाने आराेपीचा शाेध सुरू केला. त्याच्या अटकेसाठी स्वतंत्र पाेलिस पथक नियुक्त करण्यात आले. फिर्यादी महिलेकडे याबाबत अधिक सखोल चाैकशी केली असता त्यांनी सांगितलेल्या माहितीवरून, वर्णनावरून आणि निलंगा नगरपरिषदेच्या वतीने शहरात बसलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या पाहणीतून मिळालेल्या माहितीनुसार १ एप्रिल रोजी खबऱ्याने पाेलिसांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे एकाला रामेगावातून ताब्यात घेतले. निखिल प्रताप पाटील (वय ३३, रा. रामेगाव, ता. औसा, जि. लातूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. अधिक चाैकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
निखिल पाटील उर्फ बुंदगे याने महिलेच्या गळ्यातून हिसकावलेले सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची दुचाकी असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गोविंद राठोड हे करत आहेत. ही कारवाई पोलिस अंमलदार सुधीर शिंदे, संदीप कांबळे, नितीन मस्के यांच्या पथकाने केली.