किल्लारीत दोन ठिकाणी धाडसी चोरी, अडीच लाखांचा ऐवज लंपास
By हरी मोकाशे | Published: October 1, 2022 06:19 PM2022-10-01T18:19:09+5:302022-10-01T18:19:37+5:30
देवघराच्या दाराचे कडी-कुलूप गॅस कटरने तोडून, तर दुसऱ्या ठिकाणी दुकानाचा पत्रा काढून केली चोरी.
किल्लारी (जि. लातूर) : किल्लारीतील एकाच्या देवघराच्या दाराचे कडी-कुलूप गॅस कटरने तोडून, तर दुसऱ्या ठिकाणी दुकानाचा पत्रा काढून साेन्या- चांदीच्या दागिन्यांसह मूर्ती आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ६० हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
किल्लारीतील प्रदीप जगताप यांच्या घरातील देवघराच्या दाराची कडी- कुलूप अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री गॅस कटरने तोडले. कपाटातील सोन्याच्या पाटल्या, चार अंगठ्या, कर्णफुले असे ११ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, ३०० ग्रॅम चांदी आणि रोख ४२ हजार पळविले. याप्रकरणी प्रदीप जगताप यांनी शनिवारी किल्लारी ठाण्यात तक्रार दिली आहे.
दरम्यान, याच रात्री गावातील चंद्रकात बिराजदार यांच्या आडत दुकानच्या पाठीमागील पत्रा काढून आतील चांदीच्या दोन मूर्ती, दोन हजार रुपये आणि ७०० रुपये चिल्लर अज्ञात चोरट्यांनी पळविल्याचे बाळू चंद्रकांत बिराजदार यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास सपोनि सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजपूत, गौतम भोळे, आबा इंगळे हे करीत आहेत. दरम्यान, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. मात्र, हे पथक पाण्याच्या टाकीच्या परिसरात घुटमळले. तसेच ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.