बांधकाम लोखंडी साहित्याची चोरी; टोळीतील एक अडकला जाळ्यात !
By राजकुमार जोंधळे | Published: October 18, 2023 07:27 PM2023-10-18T19:27:52+5:302023-10-18T19:27:52+5:30
ही कारवाई लातूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली
लातूर : बांधकामावरील लोखंडी साहित्य चोरणाऱ्या टोळीतील एकाला अटक करण्यात आली असून, वाहनासह १ लाख ६६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई लातूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज केली.
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यातील चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या अटकेचे आदेश दिले होते. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचा मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकानी आरोपीचा शोध सुरु केला. दरम्यान, गुन्ह्याची माहिती काढताना असताना पोलिसांना खबऱ्याने माहिती दिली. बांधकामावरील लोखंडी साहित्य चोरणारी टोळी कार्यरत असून, या टोळीने चोरलेला मुद्देमाल वाहनात भरून इतर ठिकाणी विक्री करणार आहेत. ही माहिती मिळाली. या माहितीच्या आधरे पोलिस पथकाने नांदेड रोडला जाणाऱ्या एका शाळेसमोर थांबलेल्या ऑटोला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर ऑटोमध्ये बांधकामाचे साहित्य आढळले. यावेळी मनोज नागनाथ पांचाळ (वय २१, रा. बोरी सलगरा, ता. लातूर, ह.मु. कोयना पावर हाऊस जवळ, लातूर) याला अटक करण्यात आली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले, गत काही दिवसापूर्वी मी आणि माझ्यासोबतच्या इतर दोन महिलांनी मिळून कव्वा रोड परिसरातील एका बांधकामावरील लोखंडी सळई, सेंट्रींग प्लेटची चोरी करून विक्री केले आहे. तर राहिलेल्या साहित्याची विक्री करणार होतो, असे सांगितले. याबाबत विवेकानंद चौक ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, सहाय्यक फौजदार संजू भोसले, अंमलदार सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, योगेश गायकवाड, प्रकाश भोसले, यांनी केली आहे.