औसा पंचायत समितीतून शैक्षणिक साहित्याची चोरी
By आशपाक पठाण | Published: December 12, 2023 08:34 PM2023-12-12T20:34:21+5:302023-12-12T20:34:34+5:30
खिडक्या फोडल्या : कर्मचाऱ्याला पाहून चोरटे कपाट टाकून पसार
लातूर : औसा पंचायत समितीच्या जुन्या इमारतीतील पाचपैकी तीन खोल्यांचे कुलूप तोडून, खिडक्या फोडून चोरट्यांनी शैक्षणिक साहित्य पळविले. तसेच लाकडी कपाट उचलून घेऊन जात असल्याचे एका महिला कर्मचाऱ्याने पाहून आरडाओरड केली असता चोरटे कपाट तेथेच टाकून पसार झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचायत समितीच्या जुन्या इमारतीमधील पाच खोल्यापैकी तीन खोल्यांच्या दाराचे कुलूप, खिडक्या फोडून चोरट्यांनी सोमवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास कुणी नसल्याचे पाहून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी खोलीत ठेवलेले शैक्षणिक साहित्य चोरट्यांनी पळविले. तद्नंतर शिक्षण विभाग कार्यालय परिसरातून दोन अज्ञात व्यक्ती लाकडी कपाट घेऊन जात असताना कार्यालयीन कर्मचारी आशा कल्याणी यांनी पाहिले.
कार्यालयातील कपाट कोण घेऊन जात असेल हे पाहून त्यांनी आरडाओरड केली. यावेळी चोरट्यांनी लाकडी कपाट टाकून पळ काढला. याप्रकरणी शिक्षण विभागातील गोविंद फत्तू राठोड (रा. विशाल नगर, लातूर) यांनी औसा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक फौजदार कांबळे करीत आहेत.