पोलीस असल्याची बतावणी करून दीड लाखाचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 07:21 PM2021-02-03T19:21:13+5:302021-02-03T19:22:18+5:30
रिंग रोड परिसरातील ऑटोच्या थांब्यावर लातूरमधील आदित्य अंगण सोसायटीतील मुरलीधर दिगंबर चाकूरकर हे बँकेत जाण्यासाठी थांबले होते.
लातूर : रिंग रोड परिसरात बँकेत जाण्यासाठी ऑटो पॉईंटवर थांबलेल्या एका व्यक्तीच्या हातातील ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करून हातचलाखीने लंपास केल्याची घटना घडली. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दोघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रिंग रोड परिसरातील ऑटोच्या थांब्यावर लातूरमधील आदित्य अंगण सोसायटीतील मुरलीधर दिगंबर चाकूरकर हे बँकेत जाण्यासाठी थांबले होते. आदित्य अंगण सोसायटी येथून बँकेत जाण्यासाठी ते चालत आले होते. ते ऑटो पॉईंटजवळ आल्यानंतर सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास मोटारसायकलवरून दोघे तरुण त्यांच्याजवळ आले. त्यांनी या परिसरात आताच एका महिलेच्या अंगावरील दागिन्यांची चोरी झाल्याचे चाकूरकर यांना सांगितले. आम्ही पोलीस आहोत, त्याचा तपास करत आहोत. तुमच्याजवळ असलेले दागिने सांभाळून ठेवा, कपड्यात बांधून ठेवा, असे म्हणत त्यांच्या हातात असलेले ५० ग्रॅम वजनाचे कडे त्या दोघांनी खिशात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी हातचलाखी करून कडे लंपास करून तेथून पोबारा केला, अशी फिर्याद मुरलीधर चाकूरकर यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात कलम १७०, ४१९, ३७९, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स.पो.नि. पाटील करीत आहेत.