उदगीर येथून दुचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:00 AM2021-01-08T05:00:59+5:302021-01-08T05:00:59+5:30
संगणमत करून एकास मारहाण लातूर : तुम्ही माझे २५०० रुपयांचे नुकसान का केले, असे विचारले असता चौघा जणांनी एकास ...
संगणमत करून एकास मारहाण
लातूर : तुम्ही माझे २५०० रुपयांचे नुकसान का केले, असे विचारले असता चौघा जणांनी एकास मारहाण केल्याची घटना नई आबादी परिसरात घडली. या प्रकरणी फिर्यादी जगन्नाथ रामचंद्र मुळे यांच्या तक्रारीवरून उदगीर शहर पोलिसात सोमनाथ रामचंद्र मुळेसह सोबत असलेल्या तिघा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोह. पुठ्ठेवाड करीत आहेत.
घराचे कुलूप तोडून ऐवज लंपास
लातूर : कामानिमित्त लातूर येथे गेल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील चांदीचे दागिने, कानातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम ५ हजार असा एकूण ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना अहमदपूर शहरातील लेक्चर कॉलनी येथे घडली. या प्रकरणी मिनाक्षी दीपक शिंगडे (३८, रा. लेक्चर कॉलनी) यांच्या तक्रारीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. बडे करीत आहेत.
जोरात का बोललास म्हणून मारहाण
लातूर : तुम्ही आमच्या मुलाला जोरात का बोलला या कारणावरून शिवीगाळ करीत काठीने मारून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या कारणावरून फिर्यादी अंकुश इराप्पा शिंदे (६५, रा. उजेड, ता. शिरूर अनंतपाळ) यांनी राजू तुकाराम करम आणि सोबत असलेल्या दोघा जणांविरोधात शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोह. कच्छवे करीत आहेत.
दगडफेक करून दुकानाचे नुकसान
लातूर : शहरातील टाके नगर येथील एका फुटवेअर दुकानासमोरील कट्ट्यावर बसून गप्पा मारत असणाऱ्या चौघा जणांना तुम्ही येथे बसू नका, असे म्हटले असता चौघा जणांनी शिवीगाळ करून फिर्यादीस मारहाण केली. या प्रकरणी सुमेर खदीर टाके यांच्या तक्रारीवरून चौघा जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार राठोड करीत आहेत.
दयानंद महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार
लातूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या युवा महोत्सवात दयानंद कला महाविद्यालयातील संघाने यश मिळविले आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, अजिंक्य सोनवणे, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, अनिलकुमार माळी, डॉ. देवेंद्र कुलकर्णी, डॉ. संदीपान जगदाळे, प्रा.सी.ए.शिंदे, दीप्ति जाधव, साक्षी आदमाने, अरुणा आडे आदी उपस्थित होते.
शेतकरी संघटनेची रविवारी बैठक
लातूर : शेतकऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी रविवारी दुपारी १२ वाजता पत्रकार भवन येथे शेतकरी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कर्जमुक्ती, वीजबिल मुक्ती, अतिवृष्टी अनुदान, ऊस दर प्रश्नावर चर्चा केली जाणार आहे. उपस्थितीचे आवाहन जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके यांनी केले आहे.
ढगाळ वातावरणाचा रबी पिकांवर परिणाम
लातूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे रबी हंगामातील हरभरा, गहू, करडई आदी पिकांवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना फवारणीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यात यंदा ३ लाख २७ हजार हेक्टरवर रबीचा पेरा झाला आहे.