रेणापूरच्या खलंग्री-गोढाळा शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 13:31 IST2025-01-29T13:31:25+5:302025-01-29T13:31:59+5:30
मृतदेहावर जखमेचे निशाण; फॉरेन्सिक व श्वान पथकासह किनगाव पोलिसांनी सुरू केला तपास

रेणापूरच्या खलंग्री-गोढाळा शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
रेणापूर ( लातूर ) : तालुक्यातील खलंग्री ते किनगाव रोडलगतच्या शेतात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आज, बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहावर जखमेच्या खुणा दिसून येत असल्याने ही हत्या असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सध्या फॉरेन्सिक व श्वान पथकासह किनगाव पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
तालुक्यातील खलंग्री-गोढाळा शिवारात किनगाव ते खलंग्री रोडलगत गट नंबर ४५ मधील धनाजी सूर्यवंशी ( रा . व्होटी) या शेतकऱ्याची शेती आहे. आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान किनगावकडून कारेपूरकडे एक भंगारवाला जात होता. त्याला या रोडलगतच्या शेताजवळ अज्ञात व्यक्ती पडलेला दिसला. त्याने तात्काळ खलंग्रीचे माजी उपसरपंच तथा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांना फोनवरून याची माहिती दिली. बोळंगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन किनगाव पोलिसांत ही खबर दिली.
दरम्यान, किनगाव पोलीस ठाण्याचे एपीआय यांनी कर्मचाऱ्यसह घटनास्थळी येऊन पाहणी केली. पुढील तपासासाठी फॉरेन्सिक व श्वान पथकाला पाचरण केले. मृताची अद्याप ओळख पटलेली नसून अंगावर जखमा दिसून येत आहेत. त्यामुळे या व्यक्तीचा मारहाण करून खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. डीवायएसपी चंद्रकांत रेड्डी यांनी घटनास्थळी दाखल होऊन तपासासाठी काही सूचना केल्या असून पुढील तपास सुरू असल्याचे चाकूर-रेणापूर उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत रेड्डी यांनी सांगितले.