अदानींचे नुकसान नको म्हणून सोयाबीनला दर नाही; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 04:53 PM2024-05-04T16:53:41+5:302024-05-04T16:54:43+5:30
गरिबांना लुटणाऱ्या सरकारला जनता धडा शिकवेल.
लातूर / अहमदपूर : सोयाबीन तेल उत्पादन करणाऱ्या अदानींचे नुकसान होऊ नये म्हणून सरकार सोयाबीनचे दर वाढू देत नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आत्महत्या वाढल्या आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी येथे केला.
अहमदपूरच्या सभेत तसेच लातूर येथील पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी भाजपा सरकारवर टीका केली. ते म्हणाले, नागरिकांना आता बदल हवा आहे. काँग्रेसवर लोकांचा विश्वास वाढला आहे. जुमलेबाज सरकार पायउतार होईल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकात दिलेल्या पाच गॅरंटी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे गरिबांना लुटणाऱ्या सरकारला जनता धडा शिकवेल. अहमदपूरच्या सभेत ते म्हणाले, देशात महिला सुरक्षित नाहीत. लातुरात भाग्यश्री सुडे या युवतीची हत्या झाली. त्यावर खासदार बोलत नाहीत. भाजप सरकारने सोयाबीन, कापसाला भाव देण्याची घोषणा केली. परंतु, दहा वर्षांत भाववाढ सोडा, उलट कमी झाले.
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांची भलावन करणारे आता आपण खरे देशभक्त आहोत, असे म्हणत आहेत. सध्या देशात जुलमी राजवट सुरू असून, विकास न करता यापूर्वी शहिदांची नावे घेऊन निवडणूक जिंकली. आता प्रभू श्रीरामाचे नाव घेत मते मागत आहात. दहा वर्षांत काहीच न करता धनदांडग्यांना देश विकण्यासाठी सरकार चालविले, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.
पत्रपरिषदेला श्रीशैल उटगे, विद्या पाटील उपस्थित होत्या. तर सभेला काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, उमेदवार माजी मंत्री आ. अमित देशमुख, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, उमेदवार डॉ. शिवाजी काळगे उपस्थित होते.
पक्ष फोडले, खिडक्या चोरल्या
सरकारने शिवसेना पक्ष फोडला. शरद पवार यांचे घर फोडले. काँग्रेसच्या काही खिडक्या चोरल्या, अशी टीका माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी केली.