चार महिन्यांपासून अनुदानाचा छदामही नाही; ५३ कोटी थकल्याने लाभार्थी आर्थिक संकटात!
By हरी मोकाशे | Published: August 9, 2024 06:42 PM2024-08-09T18:42:00+5:302024-08-09T18:42:53+5:30
उसनवारी करुन बांधकाम साहित्याची खरेदी
लातूर : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांची प्रगती व्हावी म्हणून मग्रारोहयोअंतर्गत विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. मात्र, चार महिन्यांपासून बांधकाम व अन्य आवश्यक साहित्याचे ५३ कोटी ५३ लाखांचे अनुदान थकित राहिले आहे. दरम्यान, काही लाभार्थ्यांनी वेळेवर अनुदान मिळेल, या आशेने उसनवारी केली. परंतु, अनुदानापोटी शासनाकडून छदामही मिळाला नसल्याने आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाकडे वारंवार चौकशी करीत आहेत.
ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे आणि त्यातून शेती उपयोगी, पाणीपुरवठा, दळणवळण, पर्यावरण संवर्धनाची कामे व्हावीत व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून केंद्र शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येते. या योजनेचा मजूर, शेतकऱ्यांना चांगला लाभ झाला आहे. त्यामुळे मग्रारोहयोअंतर्गतच्या कामांकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत दर आठवड्यास कामाचे मोजमाप करुन मजुरांना मजुरी दिली जाते तर अकुश म्हणजे आवश्यक साहित्यापोटी अनुदान देण्यात येते.
मग्रारोहयोअंतर्गत विविध ११ कामे...
मग्रारोहयोअंतर्गत बांबू, वृक्ष लागवड, जनावरांचा गोठा, शेततळे, वैयक्तिक व सामुहिक सिंचन विहीर, रोपवाटिका, तुती लागवड, रस्ते, ग्रामपंचायत भवन, दुतर्फा वृक्ष लागवड, सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर अशी ११ प्रकारची कामे करण्यात येतात. या कामांसाठी रोपे, विटा, वाळू, सिमेंट, सळई अशा कामांसाठी कुशल म्हणून निधी देण्यात येतो.
सिंचन विहिरींचे १३ कोटी रखडले...
कामाचा प्रकार - थकित रक्कम
बांबू, वृक्ष लागवड - १० लाख ६ हजार
जनावरांचा गोठा - १० कोटी ७० लाख
शेततळे - २१ लाख ५५ हजार
सिंचन विहीर - १२ कोटी ९६ लाख
रोपवाटिका - ४ लाख ४४ हजार
तुती लागवड - ३ लाख १५ हजार
रस्ते - २८ कोटी ९९ लाख
ग्रामपंचायत भवन - ४२ लाख ४५ हजार
शोषखड्डे - १ लाख ८४ हजार
वृक्ष लागवड - ४५ हजार
सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर - ३ लाख ३९ हजार
एकूण - ५३ कोटी ५३ लाख
तालुका - प्रलंबित निधी
अहमदपूर - २,४१,४८,०६०
औसा - ५,४१,१७,३९७
चाकूर - १०,९१,६८,३६८
देवणी - ५,९५,७७,१९४
जळकोट - १,३०,६०,९७२
लातूर - ९,२५,१७,८६२
निलंगा - ८,३६,३२,६९२
रेणापूर - ४,५०,४५,१७१
शिरुर अनं. - ३३,२६,१६४
उदगीर - ५,०८,०३,११६
एकूण - ५३,५३,९६,९९७
उसनवारी करुन गोठा बांधला...
पशुधनाच्या संरक्षणासाठी मग्रारोहयोअंतर्गत गोठा बांधला. अनुदानापेक्षा अधिक प्रमाणात पैसा खर्च झाला. वेळेवर अनुदान मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, चार महिन्यांपासून अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याने मोठी अडचण झाली आहे. शासनाने लवकरात लवकर अनुदान द्यावे.
- अर्जुन उटगे, हरंगुळ बु.
गोठा बांधल्यामुळे पेरणीला पैसे नव्हते...
मग्रारोहयोअंतर्गतच्या कामाचे वेळेवर पैसे मिळतात म्हणून शेतात गोठा बांधला. मात्र, अनुदानाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे खरीप पेरणीवेळी अडचण निर्माण झाली. तेव्हा उसनवारी करावी लागली. शासनाने अनुदानाचे लवकर वितरण करावे.
- नागेश वाघमारे, हरंगुळ बु.
शासनाकडे अनुदानाची मागणी...
मग्रारोहयोअंतर्गत अनुदान ऑनलाईनरित्या जमा होतात. काही दिवसांपासून कुशलचे अनुदान थकित राहिले असल्याने शासनाकडे अनुदान मागणी केली आहे. निधी प्राप्त होताच लाभार्थ्यांना कळविण्यात येईल.
- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.