नळ कनेक्शन नसताना पाणीपट्टीचा दणका, लातूर मनपाच्या व्हॉटस्ॲपवर तक्रारींचा पाऊस !

By हणमंत गायकवाड | Published: September 26, 2022 06:07 PM2022-09-26T18:07:57+5:302022-09-26T18:07:57+5:30

मालमत्ता कर आणि नळपट्टीची एकत्र मागणी बिल शहरातील मालमत्ताधारकांना देण्यात आली आहे.

There is no tap connection, still tax claims, there is a rain of complaints on WhatsApp of Latur Municipality! | नळ कनेक्शन नसताना पाणीपट्टीचा दणका, लातूर मनपाच्या व्हॉटस्ॲपवर तक्रारींचा पाऊस !

नळ कनेक्शन नसताना पाणीपट्टीचा दणका, लातूर मनपाच्या व्हॉटस्ॲपवर तक्रारींचा पाऊस !

Next

लातूर : महापालिकेने मालमत्ता व नळधारकांना दिलेल्या अनेकांच्या थकबाकी बिल पत्रामध्ये अव्वाच्या सव्वा मागणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे मालमत्ता व नळधारक हैराण झाले असून, ७५ टक्के नागरिकांकडे नळ कनेक्शन नसताना नळपट्टीची मागणी केल्याचे मनपाच्या व्हॉटस्ॲपवर आलेल्या गाऱ्हाण्यावरून आता उघड झाले आहे. 

मालमत्ता कर आणि नळपट्टीची एकत्र मागणी बिल शहरातील मालमत्ताधारकांना देण्यात आली आहे. त्यामध्ये अनेकांकडे नळ कनेक्शन नसताना त्यांना नळपट्टी लावलेली आहे. शिवाय, अनेकांनी मालमत्ता कराची थकबाकी भरली असताना परत मागणी बिल देण्यात आले आहे. यावर महानगरपालिकेने मालमत्ताधारकांकडून ७७७००१४३०५ या व्हॉटस्ॲपवर तक्रार करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार १७० जणांनी व्हॉटस्ॲपवर तक्रार नोंदविली आहे. यातील ७५ टक्के तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे की, माझ्याकडे नळ कनेक्शन नाही. तरीपण बिल देण्यात आले आहे. उर्वरित २५ टक्क्यांमध्ये काही जणांनी बिल भरले आहे, तर काही जणांना जास्त बिल लागले आहे. या व्हॉटस्ॲप क्रमांकावर तक्रारींचा ओघ सुरूच आहे.

२० हजार नळ कनेक्शनचा पत्ता लागेना !
पाण्याचा वापर होत असलेल्या २० हजार नळकनेक्शनचा महानगरपालिकेला पत्ता लागत नाही. त्यामुळेही ज्यांच्याकडे कनेक्शन नाही त्यांनाच बिल देण्यात आले आहेत. या सर्व बाबींचा शोध आता व्हॉटस्ॲपच्या तक्रारीवरून लागणार आहे.

भाडेकरूंच्या नावाने नळ कनेक्शन
मालमत्ता नसताना भाडेकरूंच्या नावाने नळकनेक्शन आहे. मालमत्ता एकाच्या नावाने आणि भोगवटादाराच्या नावाने नळ कनेक्शन असल्यामुळेही पाणीपट्टी आणि मालमत्ता कराच्या एकत्र बिलाचा घोळ झालेला आहे. दरम्यान, संबंधित व्हॉटस्ॲप क्रमांकावर तक्रारी नोंदवाव्यात. त्याची सोडवणूक करून होणारी गैरसोय टाळली जाईल, असे आश्वासन मनपाकडून देण्यात येत आहे.

आतापर्यंत १७० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नळपट्टीबाबतच्या तक्रारी तात्काळ विचारात घेऊन त्या सोडविल्या जात आहेत. मालमत्ता कराच्या बाबतचे गाऱ्हाणे मात्र संबंधित झोनच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे पाठवून खात्री करून घेतली जात आहे. लवकरच हा प्रश्न निकाली निघेल. 
- मयुरा शेंद्रेकर, उपायुक्त मनपा

Web Title: There is no tap connection, still tax claims, there is a rain of complaints on WhatsApp of Latur Municipality!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.