अतिवृष्टी झाली, पीक पाण्यात गेले; शेतकऱ्याने गोठ्यात घेतला गळफास
By राजकुमार जोंधळे | Published: September 27, 2024 10:08 PM2024-09-27T22:08:56+5:302024-09-27T22:09:23+5:30
प्रभू देवराव गाडीकर (वय ५५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
औराद शहाजानी (जि. लातूर) : गत काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून, अलीकडे झालेल्या अतिवृष्टीने शेतातील उभे पीक पाण्यात गेले. हे नुकसान पाहून व्यथित झालेल्या एका शेतकऱ्याने शेतातील गोठ्यातच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना चांदोरी (ता. निलंगा) शिवारात शुक्रवारी पहाटे घडली. प्रभू देवराव गाडीकर (वय ५५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
चांदोरी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रभू गाडीकर यांना वडिलोपार्जित दीड एकर शेती आहे. त्यातही कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे पिके पाण्याखाली गेली असून, ते शुक्रवारी पहाटे घरातून शेताकडे गेले होते. दरम्यान, शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये दांडीला गळफास घेत आत्महत्या केली. सतत होणारी नापिकी, त्यातच दीड एकर शेती, काहीही भागत नसल्याने स्वतःच्या मुलाला दुसऱ्याच्या शेतात शेतमजूर म्हणून कामाला ठेवले.
मात्र, कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा? या विवंचनेत आलेले, हातात आलेले तूर, सोयाबीन पाण्यात गेले. अतिवृष्टी झाल्याने हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे मुलगा खंडू गाडेकर यांनी सांगितले. याबाबत औराद शहाजानी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मयत शेतकरी प्रभू गाडीकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.