CoronaVirus : कोरोना चाचणीच्या ६० लॅब होणार- वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 05:07 AM2020-04-28T05:07:05+5:302020-04-28T05:40:56+5:30
४ वरून ४० लॅब कार्यान्वित केल्या. ज्यामुळे राज्यात सर्वाधिक १ लाखापेक्षा अधिक चाचण्या झाल्या.
लातूर : राज्यात सध्या खासगी व शासकीय अशा एकूण ४० लॅबमध्ये कोरोना चाचणी केली जाते. लवकरच त्यात वाढ करून ६० लॅब कार्यान्वित होतील. दरम्यान, सद्य:स्थितीत दररोज ७ हजार चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी येथे दिली.
राज्यात ४ लॅब होत्या. कोविड-१९ च्या संकटाची चाहूल लागताच राज्य सरकारने तातडीने पावले उचलत वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांच्या रुग्णालयांत तत्परतेने काम सुरू केले. ४ वरून ४० लॅब कार्यान्वित केल्या. ज्यामुळे राज्यात सर्वाधिक १ लाखापेक्षा अधिक चाचण्या झाल्या.
राज्य सरकारने चाचण्या वाढविल्या, परंतु अधिक प्रमाणात टेस्टिंग किटची गरज असून त्याची उपलब्धता केंद्र सरकारकडून झाली पाहिजे. सद्य:स्थितीत पीपीई कीट व मास्कची संख्या पुरेशा प्रमाणात आहेत. रुग्णसंख्या दडवत असल्याच्या विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री व शासकीय यंत्रणा २४ तास कार्यरत आहे, असेही ते म्हणाले.
राज्यातील सरकारी रुग्णालयांबरोबरच महापालिकांच्या रुग्णालयांमध्येही कोविड-१९ च्या चाचण्या, उपचार, जेवण या सर्व सुविधा मोफत देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आहे, असे त्यांनी सांगितले.
>विभागाला अधिक निधी मिळावा
वैद्यकीय शिक्षण विभागाला यापुढे प्राधान्याने जास्तीत जास्त निधी मिळावा म्हणून मी स्वत: आक्रमक भूमिका घेणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. विभागाकडे १८ मेडिकल कॉलेज आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्पात ३,७५० कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यातील ७० ते ७५ टक्के रक्कम २२ हजार कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होते. या रकमेतून औषध, यंत्रसामुग्री आणि रुग्णांच्या जेवणाचा खर्च भागवायचा आहे. ही रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे.