कोविड सेंटरमधील रुग्णांना घराकडून दिल्या जाणाऱ्या डब्याची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:17 AM2021-04-26T04:17:28+5:302021-04-26T04:17:28+5:30
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला असून, शहरात बाधितांची संख्या २५०च्या जवळपास पोहोचली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तालुका प्रशासन कठोर निर्णय ...
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला असून, शहरात बाधितांची संख्या २५०च्या जवळपास पोहोचली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तालुका प्रशासन कठोर निर्णय घेणार आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करून तहसीलदार डॉ. बिडवे म्हणाले, राज्य शासनाने १ मेपर्यंत लॉकडाऊन लागू केले आहे. परंतु, काहीजण आजही बिनधास्त फिरत आहेत. विनाकारण रस्त्यावर दिसून येत आहे. होम आयसोलेशनमधील काही जण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढत आहे. कोरोना केअर सेंटरमध्ये बाधितांच्या नातेवाइकांना प्रवेश नसतानाही गर्दी करीत आहेत. तेव्हा नागरिकांनी अशी गर्दी करू नये.
रस्त्यावर नाहक फिरणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी तसेच विनामास्क फिरणाऱ्यांना रोखण्यासाठी शहरात महसूल, पोलीस, नगरपंचायती कर्मचाऱ्यांची पथके निर्माण करून कार्यवाही केली जाणार आहे. शहरात फिरते पथक तैनात राहणार आहे. कोविड सेंटरमध्ये स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. गावपातळीवर सरपंच, तलाठी, ग्रामसेवकांची कोरोना दक्षता समिती आहे. गाव पातळीवर त्यांनी सतर्क रहावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, असे आदेश ग्रामसेवकांना दिले आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालयात ३० खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. लवकरच कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनयुक्त ५० खाटांची सुविधा होणार आहे. त्यासाठीचे साहित्य मागविण्यात आले आहे, असेही तहसीलदार डॉ. बिडवे म्हणाले. यावेळी पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे उपस्थित होते.
दंडात्मक कार्यवाही केली जाणार...
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट यांनी सांगितले. ग्रामीण भागातून काहीजण विनाकारण शहरात येत आहेत. शहरात बेफिकीरपणे फिरणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे लागतील, असेही पो.नि. सिरसाठ म्हणाले. नगरपंचायतीचे कर्मचारी सोमवारपासून शहरात कार्यन्वित राहतील. कोविड सेंटरमधील स्वच्छता चांगल्या प्रकारे होत आहे, असे मुख्याधिकारी रणदिवे यांनी सांगितले.