थेरगाव शोकाकुल; शहीद जवान सूर्यकांत तेलंगे यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 06:46 PM2022-06-28T18:46:57+5:302022-06-28T18:48:57+5:30
पठाणकोट येथील सीमेवर झालेल्या चकमकीत ते सोमवारी शहीद झाले.
थेरगाव (जि. लातूर) : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील थेरगाव येथील भारतीय सैन्य दलातील जवान सूर्यकांत शेषेराव तेलंगे हे पठाणकोट येथील सीमेवर कर्तव्य बजावताना झालेल्या चकमकीत सोमवारी पहाटे शहीद झाले. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. शहीद जवान तेलंगे पार्थिव बुधवारी दुपारी थेरगावात पोहोचणार असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
थेरगाव येथील शेतकरी कुटुंबातील जवान सूर्यकांत शेषेराव तेलंगे (३५) हे सन २००७ मध्ये भारतीय सैन्यातील ब्रिगेड ऑफ दि गार्डस रेजिमेंटमधील १५ गार्डस बटालियनमध्ये रुजू झाले होते. ते सध्या सैनिक हवालदार म्हणून कार्यरत होते. पठाणकोट येथील सीमेवर झालेल्या चकमकीत ते सोमवारी शहीद झाले. ही माहिती समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मंगळवारीही गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आल्याने गावात दुखवटा होता.
शहीद जवान तेलंगे यांचे पार्थिव मंगळवारी अमृतसर येथून विमानाने निघाले आहे. बुधवारी पहाटे पुणे येथे पोहोचणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दरम्यान, शिरूर अनंतपाळचे तहसीलदार अतुल जटाळे, मंडळ अधिकारी कुलकर्णी, तलाठी कैलास कुरुडे, पोलीस निरीक्षक रामेश्वर तट, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिनगारे, सय्यद, विकास अर्जुने, येडले यांनी गावात येऊन अंत्यविधीसाठीच्या जागेची पाहणी केली. यावेळी ग्रामसेवक परमेश्वर शिरुरे, उपसरपंच सुनील पाटील आदी उपस्थित होते.
प्रेमनाथ विद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शन...
शहीद जवान तेलंगे यांचे पार्थिव गावात आल्यानंतर अंत्यदर्शनासाठी गावातील श्री प्रेमनाथ विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार अतुल जटाळे यांनी दिली. प्रशासनाने अंत्यसंस्कारासाठी जागेची पाहणी केल्यानंतर तिथे स्वच्छता करण्यास सुरुवात करण्यात आली. तेव्हा गावातील नागरिकांसह श्री प्रेमनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या जड अंत:करणाने मदत करण्यास सुरुवात केली. यावेळी शहीद जवान सूर्यकांत तेलंगे अमर रहे, अशा घोषणा देण्यास विद्यार्थ्यांनी सुरुवात केली. तेव्हा गावातील प्रत्येकाच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले.