गॅस कटरने एमटीएम फाेडले; १८ लाखांची राेकड पळविली, हाकेच्या अंतरावर पोलिस चौकी
By राजकुमार जोंधळे | Updated: February 2, 2025 21:58 IST2025-02-02T21:58:21+5:302025-02-02T21:58:33+5:30
लातूरमध्ये स्टेट बँकेची एटीएम मशीन चोरट्यांनी फोडल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली

गॅस कटरने एमटीएम फाेडले; १८ लाखांची राेकड पळविली, हाकेच्या अंतरावर पोलिस चौकी
हाळी हंडरगुळी (जि. लातूर) : हंडरगुळी (ता. उदगीर) येथील चौकात स्टेट बँकेचे असलेली एटीएम मशीन चोरट्यांनी फोडल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. असून, चाेरट्यांनी तब्बल १७ लाख ८० हजारांची राेकड पळविली आहे. विशेष म्हणजे, हाकेच्या अंतरावर पाेलिस चाैकी आहे. याबाबत वाढवणा (बु.) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, हंडरगुळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गत दाेन वर्षांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम मशीन बसविण्यात आली आहे. हाळी हंडरगुळी हे बाजारासाठी प्रसिद्ध असलेले गाव असून, परिसरातील ३० ते ५० गावच्या नागरिकांची दैनंदिन कामासाठी वर्दळ असते. शिवाय, येथील जनावरांचा बाजार देशभर प्रसिद्ध असून, राज्यासह परराज्यातील व्यापारी, पशुपालक, शेतकरी येथे जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी येतात. दर रविवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात लाखाे रुपयांची उलाढाल हाेत असते. आर्थिक उलाढाल, व्यापारी, नागरिकांच्या साेयीसाठी एटीएम मशीन बसविण्यात आली आहे. रविवारी बाजार असल्याने संबंधित एजन्सीकडून शनिवारी रात्रीच मशीनमध्ये पैशांचा भरणा करण्यात आला हाेता. यावर नजर ठेवत अज्ञात चोरटे कारमधून आले. रविवारी पहाटेच्या वाजण्याच्या सुमारास त्यांनी गॅस कटरने मशीन कापली. त्यातील १७ लाख ८० हजारांची राेकड पळविल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
भर चाैकात चाेरी; गॅस कटरचा वापर...
भर चौकात एमटीएम मशीन असून, हाकेच्या अंतरावर पोलिस चौकीही आहे. असे असतानाही चोरीची घटना घडल्याने नागरिकांतून चर्चा होत आहे. तिघे चाेरटे कारमधून आल्याचेही पोलिसांनी सांगितले. त्यांनी गॅस कटरने मशीन कापून रोकड पळविली आहे.
व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण...
हाळी हंडरगुळी हे नांदेड-बिदर महामार्गावरील बाजाराचे माेठे गाव असून, येथे विविध प्रकारची दुकाने आहेत.चोरीच्या घटना अधून-मधून घडत असतात. एमटीएम मशीन फाेडल्याच्या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांत सध्याला भीतीचे वातावरण आहे.
रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची मागणी...
हाळी हंडरगुळी परिसरात दिवसेंदिवस चाेरीच्या घटनांत वाढत हाेत असून, रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह व्यापाऱ्यांतून होत आहे.