मुलांच्या खाेलीला कडी लावून चोरट्यांचा घरात प्रवेश; सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास
By राजकुमार जोंधळे | Published: January 24, 2023 06:27 PM2023-01-24T18:27:58+5:302023-01-24T18:29:16+5:30
घराच्या मुख्य भिंतीवरून चोरट्यांनी प्रवेश केला.
येरोळ (जि. लातूर): येथे घर फाेडून अज्ञात चाेरट्यांनी पाच ताेळे साेन्याचे दागिने आणि राेख रक्कम असा जवळपास सव्वा दाेन लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत शिरूर अनंतपाळ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, येराेळ येथील शेतकरी संगमेश्वर साकोळकर, लहान भाऊ आप्पाराव आणि आई-वडील रविवारी रात्री झाेपी गेले. दरम्यान, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घराच्या मुख्य भिंतीवरून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. संगमेश्वर व आप्पाराव या दोन मुलांच्या खाेलीला बाहेरून कढी लावली. आई-वडील झोपलेल्या खाेलीत चाेरट्याने प्रवेश केला. खाेलीतील लोखंडी कपाट मोडून सोन्याचे मनी, मगंळसूत्र, बोरमाळ, शिवणपीस, झुमके, सरपाळे, अंगठ्या, रोख दहा हजार रुपये असा एकूण २ लाख १४ हजारांचा मुद्देमाल चाेरट्यांनी लंपास केला आहे. याबाबत संगमेश्वर हावगीराव साकोळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरूर अनंतपाळ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी दिली घटनास्थळी भेट...
घरफाेडीची माहिती मिळताच शिरूर अनंतपाळ ठाण्याच्या पाेलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या धाडसी घरफाेडीमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसाचा वचक राहिला नसल्याने चाेरटे सक्रिय झाल्याची संतप्त भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.