निलंग्यात चोरट्यांचा धुमाकूळ, पुन्हा सहा दुकानं फोडली
By हरी मोकाशे | Published: September 15, 2023 12:48 AM2023-09-15T00:48:30+5:302023-09-15T00:51:03+5:30
येथे व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
लातूर : निलंगा शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी पहाटेपर्यंत शहरातील सहा दुकाने फोडून साहित्यासह रोख रक्कम पळविल्याची घटना घडली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
शहरात गेल्या दोन- तीन दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी मध्यरात्री व बुधवारी पहाटेच्या सुमारास अनय ट्रेडिंग दुकानाचा पत्रा उचकटून चोरट्यांनी रोख रकमेसह एक लाखाचे साहित्य पळविले. तसेच रामलिंगेश्वर फर्टिलायझर व सुंदर किराणा स्टोअर्सच्या दुकानाचा पत्रा उचलून आतमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यात चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही.
दरम्यान, बुधवारी मध्यरात्री ते गुरुवारी पहाटेपर्यंतच्या वेळेत शहरातील हनुमान किराणा स्टोअर्स फोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील जवळपास १० हजारांचे किराणा साहित्य पळविले. तसेच शेजारी असलेल्या बालाजी ट्रेडर्स या दुकानातील ५०० ते ६०० रुपयांची चिल्लर पळविली. त्याचबरोबर गजानन फर्टिलायझर या दुकानातील साडेतीन हजार रुपयांचे औषध चोरट्यांनी पळविले.
योगीराज लाईट सेंटर फोडले. मात्र, त्यात चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. पाटील हार्डवेअर या दुकानातील ३ हजार रुपयांची चिल्लर पळविली. या दुकानाशेजारील अवनी मोबाईल शॉपीमध्येही चोरी करण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. दोन दिवसांच्या कालावधीत चोरट्यांनी ९ दुकाने फोडल्याच्या घडल्या आहेत. यात जवळपास दीड लाख पळविले आहे. चोऱ्यांमुळे व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष तानाजी माकणीकर यांनी केली आहे.