निवडणुकीत विचार अन् तत्त्वाच्या राजकारणापासून फारकत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 08:15 PM2019-04-13T20:15:39+5:302019-04-13T20:23:21+5:30
अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांच्याशी संवाद
लातूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्य उद्देश बाजूला राहत आहे. विचार आणि तत्त्वाच्या राजकारणाला बगल देत मुद्याऐवजी गुद्याचे राजकारण केले जात आहे. प्रबोधनाऐवजी एकमेकांवर चिखलफेकच प्रचारात दिसून येत आहे. मागच्या पाच वर्षांत काय केलं आणि पुढे काय करणार या मुद्यांवर निवडणुकीत चर्चा होताना दिसत नाही. व्यक्तिगत पातळीवर आरोप-प्रत्यारोप करणे आणि मतदारांचे मनोरंजन करणे हाच अजेंडा दिसतोय. असे परखड मत अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी त्यांच्याशी केलेल्या संवादात व्यक्त केले.
व्यसनविरोधी कायदा अद्याप प्रलंबित
विचार, तत्त्वाच्या राजकारणाची मांडणी उमेदवारांकडून होत नाही. लोकशाहीसाठी उमेदवारांचे हे तंत्र अडथळा ठरेल.
केजी टू पीजीपर्यंत मोफत शिक्षण. आम जनतेला आरोग्य सुविधा देण्यासाठी विमा कवच. या मुद्यांवर तर कोणी बोलतच नाही. तरुणांना रोजगाराची हमी, शेतकऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण योजना घेऊन कोणताही उमेदवार समोर आलेला दिसत नाही. प्रस्तुत मुद्दे महत्त्वाचे असताना त्याला कोणी हात घालत नाही. व्यसनविरोधी कायदा अंनिसच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला, पण अंमलबजावणी होत नाही, हे मुद्देही राजकीय पक्ष विसरलेले आहेत.
लोकशाही आणि संविधान मूल्यांची जपणूक व्हावी
स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही लोकशाहीची मूल्ये आहेत. परंतु, हल्ली विचार स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न होतोय की काय, असे वाटते आहे. निर्भीडपणे विचार मांडता यावा, याचे स्वातंत्र्य आपल्या लोकशाही राज्यामध्ये आहे. लोकशाही संवर्धनासाठी केवळ राजकीय पक्षांकडून गप्पा मारल्या जातात. वास्तवात प्रयत्न होताना दिसत नाहीत. लोकशाही आणि संविधान मूल्यांना जपणे राजकीय पक्षांबरोबर नागरिकांचे कर्तव्य आहे.नवमतदारांनी सद्सद्विवेक जागृत ठेवून मतदान करावे, जेणेकरून मतदानाचा टक्का वाढेल. विकासाचे धोरण आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करणाऱ्यांना बळ द्यावे.