विषय महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, इथे नंगानाच चालू देणार नाही: चित्रा वाघ
By राजकुमार जोंधळे | Published: January 10, 2023 07:27 PM2023-01-10T19:27:11+5:302023-01-10T19:43:44+5:30
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत केंद्र आणि राज्य सरकारने विविध कायदे, याेजना अंमलात आणल्या आहेत.
लातूर : उर्फीसारखा नंगानाच महाराष्ट्रात चालू देणार नाही. हा विषय महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आहे. समाजस्वास्थ बिघडणार नाही, यासाठी प्रत्येकांनीच अशा प्रवृत्तीविराेधात लढा उभारला पाहिजे. संस्कृती अन् समाजस्वास्थ अधिक महत्वाचे आहे, अशी भूमिका भाजपा महिला माेर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी माडंली. त्या लातुरात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
मंचावर खा. सुधारकर श्रृंगारे, जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मग्गे, अरविंद पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती हाेती. चित्रा वाघ म्हणाल्या, १२ वर्षाखालील मुलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे. तर १६ वर्षांवरील मुलीवरील अत्याचारप्रकरणी २० वर्षांपेक्षा अधिक सक्तमजुरीची शिक्षा करण्याबाबत केंद्राने कायदा केला आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत केंद्र आणि राज्य सरकारने विविध कायदे, याेजना अंमलात आणल्या आहेत. त्या याेजना आता तळागाळापर्यंत पाेहचविण्यासाठी महिला माेर्चाच्या पदाधिकारी, कार्यकरतीं अधिक जाेमाने काम करणार आहेत.
लव्ह जिहादचा कायदा करा...
उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहादचा कायदा करण्याची गरज आहे. हा कायदा झाला पाहिजे, यासाठी आपण पुरवठा करणार आहे. मुली, महिलांवरील अत्याचार राेखण्यासाठी शक्ती कायदा महत्वाचा असून, ताे अंमलात आला पाहिजे.
पालकांचा संवाद हरवला...
काेराेना काळात लहान शाळकरी मुला-मुलींच्या हाती स्मार्ट फाेन आले आहेत. परिणामी, साेशल मिडियाचा वापरही माेठ्या प्रमाणावर वाढला असून, त्याचे दुष्परिणामही वाढले आहेत. सध्याला पालकांचा मुला-मुलींशी असलेला संवाद हरवला आहे, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.