‘आश्लेषा’ने दिला दगा; तर पावसासाठी ‘मघा’ची वाट बघा

By आशपाक पठाण | Published: August 17, 2023 10:08 PM2023-08-17T22:08:26+5:302023-08-17T22:08:51+5:30

उदगीर तालुक्यामध्ये दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निम्माच पाऊस

This year, there has been uneven rainfall in the taluk after Kharif sowing. | ‘आश्लेषा’ने दिला दगा; तर पावसासाठी ‘मघा’ची वाट बघा

‘आश्लेषा’ने दिला दगा; तर पावसासाठी ‘मघा’ची वाट बघा

googlenewsNext

उदगीर : यंदा खरीप पेरणीनंतर तालुक्यात असमान पाऊस झाला आहे. गेल्या दोन वर्षात झालेल्या पावसापेक्षा यंदा निम्माच पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्वच तलावातील पाणीपातळी चिंताजनक झाली आहे. ‘पुष्य’ नक्षत्राच्या शेवटी गायब झालेल्या पावसाने अश्लेषामध्येही दगा दिल्याने आता ‘मघा’ची वाट बघा म्हणत ढगाकडे बघत बसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. २० दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे.

यंदा खरिपाच्या पेरणीपासून तालुक्यात असमान पाऊस झाला आहे. गेल्या दोन वर्षांत १४ ऑगस्टपर्यंत झालेल्या  पावसापेक्षा यंदा निम्माच पाऊस झाला आहे. तालुक्यातील उदगीर मंडळात ६२६ मिमी., नागलगाव- ३२८, मोघा- ५१०, हेर- ३०३, वाढवणा- ३८४, नळगीर- ४३१, देवर्जन- ३७२, तोंडार- ४१४ मिमी. एवढा पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी दुप्पट पाऊस झाला होता. सन २०२१मध्ये दुपटीपेक्षा थोडासा कमी पाऊस झाला होता.

‘पुष्य’ नक्षत्राच्या शेवटी गायब झालेल्या पावसाने ‘आश्लेषा’मध्येही दगा दिल्याने आता ‘मघा’ नक्षत्रात ढगाकडे बघत बसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. २० दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातील पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे उशिरा शेतकऱ्यांनी पेरणी केली. आता मागील २० दिवसांपासून पाऊस नाही. त्यामुळे पिके सुकून चालली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. पुढील काही दिवसांत पाऊस न झाल्यास पिके हातातून जाणार आहे.

उदगीर  शहराला पाणीपुरवठा करणारे बनशेळकी व भोपणी हे दोन प्रकल्प पावसाच्या पहिल्या पाण्यानेच तुडुंब भरले आहेत. हे दोन प्रकल्प वगळता उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्वच तलावातील पाण्याची पातळी चिंताजनक आहे. तालुक्यात दोन मध्यम प्रकल्प असलेल्या तिरु प्रकल्पाची पाण्याची पातळी जोत्याखालीच आहे. देवर्जन मध्यम प्रकल्पात ४० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. आरसनाळ १० टक्के, कल्लूर ३ टक्के, चांदेगाव ४ टक्के, निडेबन १ टक्का, बामाजीचीवाडी ६ टक्के, करखेली ७ टक्के, गुडसूर ८ टक्के, डाऊळ हिप्परगा ८ टक्के, केसगरवाडी ७ टक्के,  पिंपरी १ टक्का असा पाणीसाठा उपलब्ध आहे. उर्वरित सर्वच तलावातील पाणीपातळी जोत्याखाली असल्याने चिंता वाढत आहे.

Web Title: This year, there has been uneven rainfall in the taluk after Kharif sowing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर