यंदाही मुलांच्या तुलनेत मुलीच वरचढ; बाेर्डात पुन्हा लातूरच अव्वलस्थानी !
By संदीप शिंदे | Published: May 21, 2024 07:03 PM2024-05-21T19:03:04+5:302024-05-21T19:03:20+5:30
कला शाखेचा ८८.५५ टक्के, विज्ञान ९८.१७, तर वाणिज्य शाखेचा ९३.९९ टक्के निकाल
लातूर : इयत्ता बारावीच्या परीक्षेत लातूर जिल्ह्यातील कला शाखेचा ८८.५५ टक्के, विज्ञान ९८.१७, तर वाणिज्य शाखेचा ९३.९९ टक्के निकाल लागला असून, मुलांच्या तुलनेत यंदाही मुलीच वरचढ ठरल्या आहेत. लातूर विभागीय मंडळांतर्गत असलेल्या तीन जिल्ह्यांमध्ये लातूर ९२.३६ टक्के मिळवीत अव्वलस्थानी राहिला आहे.
लातूर जिल्ह्यात बारावी परीक्षेस ३५ हजार ५८९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी ३३ हजार ५६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९४.३० आहे. जिल्ह्यात लातूर तालुक्याचा ९२.८८ टक्के, अहमदपूर ९५.६१, औसा ९५.८९, चाकूर ९५.७९, देवणी ९४.५८, जळकोट ९४.६३, निलंगा ९५.७८, रेणापूर ९३.९१, शिरूर अनंतपाळ ९४.९७, तर उदगीर तालुक्याचा ९४.७८ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.५६, तर मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.५० टक्के आहे.
५२३९ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात...
जिल्ह्यात परीक्षेस बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ३३ हजार ५६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यात ५२३९ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात, १४ हजार ७०२ प्रथम श्रेणीत, तर ११ हजार ७५० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखेचा निकाल ९८.१७ टक्के...
विज्ञान शाखेत १९ हजार ७२५ विद्यार्थी परीक्षेस सामोरे गेले होते. पैकी १९ हजार ३६३ उत्तीर्ण झाले असून, या शाखेचा निकाल ९८.१७ टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ कला शाखेतून ९७७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी ८६५८ उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल ८८.५५ टक्के लागला.
वाणिज्य शाखेत चार हजार उत्तीर्ण...
वाणिज्य शाखेत ४ हजार ६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी ३ हजार ८१७ उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा निकाल ९३.९९ टक्के लागला आहे. सोबतच एचएससी व्होकेशनल विभागातून १८५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी १५७० उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ८४.४९ अशी आहे.
कॉपीप्रकरणी ९ विद्यार्थ्यांवर कारवाई...
लातूर जिल्ह्यात यंदा कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडली. जिल्ह्यातील काही केंद्रांवर कॉपीची प्रकरणे आढळली होती. यातील गैरप्रकार आढळून आलेल्या ९ विद्यार्थ्यांची मंडळाकडून चौकशी करण्यात आली. चौकशीअंती या सर्व विद्यार्थ्यांच्या एक विषयाची संपादणूक रद्द करून कारवाई करण्यात आली आहे.
४७९ जणांना क्रीडा गुणांचा लाभ...
बारावी परीक्षेसाठी मंडळाकडे दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावांपैकी ४७९ विद्यार्थ्यांना क्रीडा ग्रेस गुणांचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी क्रीडागुणांचे प्रस्ताव क्रीडा विभागाकडून विभागीय मंडळाकडे सादर केले होते.
५ जूनपर्यंत करता येणार गुणपडताळणी...
ऑनलाइन निकालानंतर गुण पडताळणीसाठी २२ मे ते ५ जुनपर्यंत विहित नमुन्यात मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक आहे, असे लातूर विभागीय मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
श्रेणीसुधार गुणपत्रिका हस्तगत करणे बंधनकारक...
या परीक्षेत उत्तीर्ण झाले; परंतु गुण कमी पडले असे वाटते, अशा विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी, गुणसुधार योजनेंतर्गत लगतच्या फक्त दोनच परीक्षांमध्ये पुनश्च परीक्षेस प्रविष्ट होता येईल. फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेस प्रविष्ट होऊन सर्व विषयांत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जुलै- ऑगस्ट, फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेस श्रेणी-सुधारसाठी प्रविष्ट होता येईल. मात्र, गुणपत्रिका वितरित झाल्यापासून एक महिन्याच्या आत विकल्प भरून गुणपत्रिका हस्तगत करणे बंधनकारक राहील, असेही मंडळाने कळविले आहे.