यंदा उडीद, मूगाचा पेरा वाढला; पांढऱ्या सोन्याची लागवड दुप्पट!
By हरी मोकाशे | Published: July 29, 2024 06:56 PM2024-07-29T18:56:15+5:302024-07-29T18:57:02+5:30
यंदा उडीद, मूगाचा पेरा वाढला; पांढऱ्या सोन्याची लागवड दुप्पट!
लातूर : यंदा मृगाने दमदार बरसात केल्याने जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून खरीप पेरण्यांना प्रारंभ झाला. वरुणराजाचे वेळेवर आगमन झाल्याने जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा उडीद, मुगाचा पेरा वाढला आहे तर पांढरे सोने असलेल्या कापसाची लागवड दुप्पट झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९९.९९ टक्के पेरण्या झाल्या आहेत.
जिल्ह्यात यंदा खरीपाचा ५ लाख ९९ हजार ४५५ हेक्टर क्षेत्रावर पेरा होईल, असा अंदाज जिल्हा कृषी विभागाने व्यक्त केला होता. त्यादृष्टीने बी- बियाणे, खतांचे नियोजन केले होते. दरम्यान, मान्सूनअगोदरच रोहिण्या चांगल्या बरसल्या होत्या. तद्नंतर मृगानेही वेळेवर दमदार वर्षाव केला. तीव्र उन्हामुळे होरपळून निघालेल्या नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून बळीराजाने चाढ्यावर मूठ धरण्यास सुरुवात केली. पेरणीनंतर पिकांसाठी योग्य पाऊस झाल्याने खरीप पिके बहरली आहेत. सध्या आंतरमशागतीस वेग आला आहे.
यंदाची पेरा (हेक्टर)...
सोयाबीन - ४९०९०६
तूर - ७१४७५
मूग - ७१४१
उडीद - ५९४४
कापूस - १६२३८
सन २०२३ मध्ये पेरा (हेक्टर)...
सोयाबीन - ५४८१७०
तूर - ६४३९६
मूग - ४४४९
उडीद - २९७०
कापूस - ७५३५
सन २०२२ मध्ये पेरा (हेक्टर)...
सोयाबीन - ४८९७५२
तूर - ६८८८८
मूग - ६०७६
उडीद - ४०१९
कापूस - ६१९१
जिल्ह्यात आतापर्यंत ४५१.५ मिमी पाऊस...
लातूर - ४५७.०
औसा - ४६१.१
अहमदपूर - ५३५.९
निलंगा - ४३४.७
उदगीर - ३९९.६
चाकूर - ४७२.५
रेणापूर - ५४८.९
देवणी - ३५०.३
शिरुर अनं. - ३६४.१
जळकोट - ४०८.२
सोयाबीनच्या क्षेत्रात ५७ हजार हेक्टरची घट...
गेल्या दोन वर्षांपासून बाजारपेठेत सोयाबीनला भाव नाही. त्यामुळे लागवडीचा खर्चही पदरी पडत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. आगामी काळात चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनऐवजी अन्य पिकांकडे लक्ष केंद्रित केले आहे. परिणामी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास ५७ हजार हेक्टर क्षेत्राची घट झाल्याचे दिसून येत आहे.
आतापर्यंत ९९.९९ टक्के पेरणी...
जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ९९.९९ टक्के खरीपाची पेरणी झाली आहे. लातूर तालुक्यात १०९.७८, औसा - १०९.१९, अहमदपूर- ९४.६, निलंगा - ८९.४४, शिरुर अनं. - ९४.३४, उदगीर- ९९.१२, चाकूर - १०२.१७, रेणापूर -९९.१२, देवणी - ९६.६३, जळकोट -१०३.८९ टक्के पेरणी झाली आहे.
वेळेवर पाऊस, लवकर पेरणी...
गेल्या दोन वर्षांत उशीरा पाऊस झाल्याने खरीप पेरण्याही विलंबाने झाल्या. त्यामुळे उडीद, मुगाचा पेरा घटला होता. यंदा वेळेवर पाऊस झाल्याने पेरण्याही लवकर सुरु झाल्या. परिणामी, तूर, उडीद, मुगाचे क्षेत्र वाढले आहे. काही शेतकऱ्यांनी कपाशीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे यंदा कापसाची लागवड वाढली आहे.
- रमेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.