डोळ्यात मिरची पूड टाकून व्यापाऱ्याचे ९ लाख रुपये लुटणारे निघाले शेजारीच; तिघे अटकेत
By हरी मोकाशे | Published: February 27, 2023 05:28 PM2023-02-27T17:28:38+5:302023-02-27T17:29:03+5:30
तीन ठिकाणांहून पकडले चोरट्यांना; देवणी पोलिसांची कारवाई
देवणी (जि. लातूर) : देवणीतील एका व्यापाऱ्याच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून ९ लाख लुटल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणातील तिघा चोरट्यांना देवणी पोलिसांनी सोमवारी पहाटे जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे, हे आरोपी व्यापाऱ्याच्या घराशेजालीच निघाले आहेत.
पोलिसांनी सांगितले, देवणीतील कापड व्यापारी उमाकांत जगदीश जीवने यांनी गुरुवारी रात्री व्यवहारामुळे जमा झालेले ९ लाख ५ हजार रुपये जमा करुन ते बॅगेत ठेवले आणि नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद केले. त्यानंतर ते बसस्थानकाच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या घराकडे पायी निघाले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून रोख रकमेची बॅग पळविली होती. याप्रकरणी शुक्रवारी देवणी पोलिस ठाण्यात दोघा अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी आरोपींच्या शोधासाठी तीन पथक तयार केली. या पथकाकडून आणि पोलिस विभागाच्या सायबर क्राईम विभागाकडून तपास सुरु होता. दरम्यान, सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांचा ठावठिकाणा लागला आणि पोलिसांनी तिघांना जेरबंद केले. या तपास मोहिमेसाठी पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, पोहेकॉ. विनायक कांबळे, सुग्रीव कोंडामंगले, गणेश बुजारे, नरेश उस्तरगे, बालाजी शिंदे, श्रीराम आगलावे, अभिजीत डोईजड, संजय सावरगावे यांनी परिश्रम घेतले.
तीन ठिकाणांहून पकडले चोरट्यांना...
लूट प्रकरणात आकाश राजकुमार सूर्यवंशी (रा. देवणी), प्रशांत बालाजी सूर्यवंशी (रा. अंबानगर, हमु. देवणी) व दिलीप हनुमंत दासरी (रा. देवणी) या तीन आरोपींना देवणी पोलिसांनी पकडले आहे. विशेष म्हणजे, हे तिन्ही आरोपी देवणी, लातूर, निलंगा अशा वेगवेगळ्या तीन ठिकाणी होते. तेथून त्यांना ताब्यात घेण्यात आले. हे तिन्ही आरोपी व्यापाऱ्याच्या घराशेजारील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन लाखाच्या रकमेसह दुचाकी जप्त...
या चोरी प्रकरणातील आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून २ लाख १० हजारांची रक्कम, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.