दीडशे रुपयांसाठी काढावे लागणार हजारांचे बॅंक खाते !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:14 AM2021-07-04T04:14:53+5:302021-07-04T04:14:53+5:30
लातूर जिल्ह्यातील बॅंकातून विविध याेजनाच्या लाभार्थ्यांना थेट अनुदान वाटपाची सुविधा निर्माण केली आहे. पीक कर्जासाठी बॅकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी ...
लातूर जिल्ह्यातील बॅंकातून विविध याेजनाच्या लाभार्थ्यांना थेट अनुदान वाटपाची सुविधा निर्माण केली आहे. पीक कर्जासाठी बॅकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी हाेत आहे. आता यातच पालकांच्या गर्दीची भर पडणार आहे. विशेष म्हणजे, केवळ दाेन महिन्याच्या अल्प अनुदानासाठी बॅकेत पालकांना एक हजार रुपये भरुन खाते काढावे लागणार आहे़. शिक्षण विभागाच्या वतीने शाळांना विद्यार्थ्यांचे बॅक खाते काढण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जमा झालेल्या बॅक खात्याचा तपशील जिल्हास्तरावर द्यावा लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या बॅक खात्यावर उन्हाळ्यातील केवळ ३५ दिवसांच्या शालेय पाेषण आहाराच्या किमतीएवढा निधी जमा केला जाणार आहे.
पालकांच्या खात्यात रक्क्म जमा करावी...
सध्याला काेराेनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाउन आणि निर्बंध लागू करण्यात आले आहेत. परिणामी, खाते उघडण्यासाठी अडचणी येत आहेत. परिणामी, ही रक्कम पालकांच्या खात्यात जमा केली तर, या त्रास्तातून पालकांची सुटका हाेणार आहे. असे मत पालकांसह शिक्षक वर्गातून व्यक्त केले जात आहे. बहुतांश पालकांचे बॅक खाते काढलेले असते, त्यासाठी पुन्हा बॅक खाते काढण्याची गरज नाही.
पालकांची डाेकेदुखी वाढली...
उन्हाळ्यातील शालेय पाेषण आहारासाठी रक्क्म विद्यार्थ्यांच्या बॅक खात्यात जमा हाेणार आहे. मात्र, १५० ते २३५ रुपयांसाठी खाते काढण्याचे अग्निदिव्य पालकांना पार पाडावे लागत असून, त्यासाठी एक हजार रुपये खर्च करुन बॅक खाते काढावे लागणार आहे़ हेच त्रासदायक ठरणार आहे.
- गाेविंद मुशिराबादकर
काेराेनाने सर्वच व्यवहार आणि राेजगारावर गंडातर आले आहे. परिणामी, अर्थचक्र ठप्प झाले आहे. अशा परिस्थितीत अनेक पालकांच्या हाताला राेजगार नाही. १५० ते २२५ रुपयांसाठी एक हजार रुपये खर्च करुन बॅक खाते काढणे शक्य हाेणार नाही. यातून अनेक विद्यार्थी निधीपासून वंचित राहणार आहेत. त्यासाठी पालकांच्या खात्यावरच रक्कम जमा केल्यास वेळ आणि पैशाची बचत हाेणार आहे.
- संभाजी जाधव
बॅकेमध्ये खाते उघडण्यासाठी लागतील एक हजार रुपये...
शालेय पाेषण आहाराच्या किमतीएवढी रक्कम बॅक खात्यावर जमा हाेणार आहे.
पहिली ते पाचवीसाठी ३५ दिवसांचे केवळ १५६ रुपये, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर २३४ रुपये जमा करण्यात येणार आहेत, असे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
या निधीसाठी पालकांना मात्र बॅकेत खाते उघडण्यासाठी एक हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. झीराे बॅलेन्सवर खाते उघडण्याची सुविधा देण्यात आली पाहिजे. मात्र, बॅका या झीराे बॅलेन्सवर बॅक खाते उघडण्याबाबत उत्सुक नसल्याचे चित्र आहे.