व्यसनमुक्तीसाठी धावले हजारो लातूरकर..! जिल्हा पोलिस दलाचा उपक्रम
By राजकुमार जोंधळे | Published: December 3, 2023 06:36 PM2023-12-03T18:36:58+5:302023-12-03T18:37:19+5:30
भल्या पहाटे गुलाबी थंडीत लातूरकरांनी व्यसनाधीनतेच्या जनजागृतीसाठी धाव घेतली.
लातूर: भल्या पहाटे गुलाबी थंडीत लातूरकरांनी व्यसनाधीनतेच्या जनजागृतीसाठी धाव घेतली. जिल्हा पोलिस दलाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘एक धाव व्यसनमुक्तीसाठी’या मॅरेथॉन स्पर्धेत विविध गटांत लातूरकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला प्रतिसाद दिला. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे व अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या संकल्पनेतून ही मॅरेथॉन रविवारी सकाळी क्रीडा संकुलातून विविध गटांत पार पडली. तरुणांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेचे प्रमाण थांबविण्यासाठी व यासंदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशाने ही मॅरेथॉन झाली. त्यात ६ हजार ३५८ धावकांनी धाव घेतली. स्पर्धेत लातूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. दहा किलोमीटरच्या स्पर्धेला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली. त्यानंतर पाच किलोमीटर व तीन किलोमीटर प्रकारातील स्पर्धकांना धावण्यासाठी सोडण्यात आले.
व्यसनमुक्तीच्या फलकाने जागृती
मॅरेथॉन दरम्यान स्पर्धेच्या मार्गावर विविध शाळांतील शेकडो मुलांनी स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. यासोबतच व्यसनमुक्तीचे फलक घेऊन जनजागृतीचे कार्यही केले. विविध ठिकाणी असलेल्या संगीत ग्रुपनेही स्पर्धकांचे मनोरंजन केले. जिल्हा पोलिस दलाच्या वतीने उत्तम व्यवस्थापन झाल्याने स्पर्धकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. खेळाडूंसह विविध सायकलिस्ट ग्रुप, मॉर्निंग वॉकिंग ग्रुप, दिव्यांग ग्रुप तसेच सामाजिक संस्थांनीही यात सहभाग नोंदविला.
वॉर्मिंग अपसाठी झुंबा ठरला विशेष
पहाटे ५ वाजताच स्पर्धकांनी क्रीडा संकुलात प्रवेश केला. प्रथमत: धावपटूंच्या वॉर्मिंग अपसाठी झुंबा डान्सचे आयोजन करण्यात आले होते. संगीताच्या तालावर झुंबा डान्स करत धावपटूंचा मात्र चांगलाच वॉर्मअप झाला. त्यानंतर प्रत्यक्षात मॅरेथॉनला सुरुवात झाली. या झुंबा डान्समध्ये जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्यासह जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक अजय देवरे, सीईओ अनमोल सागर यांनीही ठेका धरला होता.
विविध वयोगटांतील स्पर्धकांचा समावेश
या मॅरेथॉन स्पर्धेत लातूरकरांनी हिरीरिने सहभाग नोंदविला होता. विशेषत: पुरुष व महिलांसह विविध वयोगटांतील स्पर्धकांनी आपले धावण्याचे कौशल्य पणाला लावले होते. काही स्पर्धकांनी तर गेल्या अनेक दिवसांपासून या मॅरेथॉनची तयारी केली होती. त्यामुळे या मॅरेथॉनला प्रचंड प्रतिसाद मिळाला.