लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी रोखले तीन बालविवाह

By संदीप शिंदे | Published: March 20, 2023 07:40 PM2023-03-20T19:40:52+5:302023-03-20T19:41:03+5:30

चाईल्ड लाईनचा टोल फ्री क्रमांक १०९८ वर मिळाली माहिती

Three child marriages prevented in a single day in Latur district | लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी रोखले तीन बालविवाह

लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी रोखले तीन बालविवाह

googlenewsNext

लातूर : महिला व बाल विकास विभागाने शनिवारी एकाच दिवशी जिल्ह्यातील तीन बालविवाह रोखले. चाईल्ड लाईन आणि इतर माध्यमातून या बालविवाहांची माहिती मिळताच महिला व बाल विकास अधिकारी देवदत्त गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी तत्काळ संबंधित पालकांचे समुपदेश, कायदेविषयक माहिती देवून हे तिन्ही बालविवाह रोखले.

रेणापूर तालुक्यातील पळशी येथील एका अल्पवयीन बालिकेचा विवाह चाकूर तालुक्यातील वडवळ येथे होणार असल्याची माहिती शनिवारी सकाळी चाईल्ड लाईनचा टोल फ्री क्रमांक १०९८ वर मिळाली. पथकाने तत्काळ विवाहस्थळी जावून बालिकेचे आई-वडील आणि मुलाचे आई-वडील व इतर नातेवाईक यांचे समुपदेशन करून बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असल्याचे सांगितले. तसेच या गुन्ह्यातील तरतुदीची माहिती दिली. बालविवाह रोखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी निकेतन कदम, पोलीस निरीक्षक पी. एम. मोहिते, बाल संरक्षण कक्षातील सीताराम कांबळे, पोहेकॉ आर. एम वाघमारे, जी.यु. बोळंगे यांनी काम पाहिजे. बाल कल्याण समितीच्या सदस्य संगीता महालींगे यांच्यासमोर बालिकेला सादर केल्यानंतर त्यांनी अठरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय बालिकेचा विवाह लावू नये, असे आदेश देवून तिला पालकांच्या ताब्यात दिले.

देवणी तालुक्यातील बामणी येथील अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने विवाहस्थळी जावून बालिकेच्या पालकांचे समुपदेशन करून बालविवाह रोखला. तसेच बालिका नांदेड जिल्ह्यातील असल्याने तिला नांदेड जिल्ह्यातील बाल कल्याण समिती समोर हजर राहण्याची नोटीस बजाविण्यात आली. या कार्यवाहीमध्ये नरेश उस्तुर्गे, सरपंच राजकुमार बिरादार, चाईल्ड लाईनच्या समन्वयक अश्विनी मंदे, बापू सूर्यवंशी यांच्या पथकाचा समावेश होता.

तिसऱ्या प्रकरणात औसा तालुक्यातील बुधोडा येथील एका अल्पवयीन बालिकेचा विवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या क्रमांकावर प्राप्त झाली. माहिती मिळताच पथकाने विवाहस्थळी जावून बालिकेच्या आई-वडिलांचे समुपदेशन केले. या कार्यवाहीमध्ये पोहेकॉ पी.जी. भीमनवाद, एस. जी. होगाडे, सीमा इंगळे यांचासमावेश होता. जिल्हा परीविक्षा अधिकारी गजानन सेलूकर, धनंजय जवळगे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे, बाल कल्याण समिती अध्यक्ष राधाकृष्ण देशमुख यांनी या तिन्ही बाल विवाह रोखण्याच्या कार्यवाहीत महत्वाची भूमिका बजाविली.

Web Title: Three child marriages prevented in a single day in Latur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.