जेवळीत भांडण सोडविणा-या वृद्धाचा खून, आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 08:35 PM2018-02-20T20:35:03+5:302018-02-20T20:35:21+5:30
तालुक्यातील जेवळी येथे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका वृद्धाचा कु-हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली.
लातूर : तालुक्यातील जेवळी येथे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका वृद्धाचा कु-हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींना अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
जेवळी येथे जनार्दन बाळासाहेब रणदिवे हा आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. घरामध्ये पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडण होत होते. दरम्यान, हे भांडण तू का पाहतो असे म्हणून जनार्दन रणदिवे यांनी चंद्रकांत कांबळे याला विचारणा केली. त्यावेळी कांबळे आणि त्याच्या कुटुंबातील अन्य काही जण जनार्दनला याबाबत जाब विचारण्यासाठी आले. आपल्या मुलाचे शेजा-यासोबत सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी बाळासाहेब शेषेराव रणदिवे हे धावले असता चंद्रकांत नवनाथ कांबळे याने त्यांच्या डोक्यात कु-हाडीचे घाव घातले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अशोक माळी यांनी दिली.
याबाबत जनार्दन रणदिवे यांच्या फिर्यादीवरून चंद्रकांत कांबळे, सुनील गुलाब कांबळे, नितीन राजेंद्र कांबळे, मिलिंद कांबळे या चौघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम ३०२, ५०४, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चारही आरोपींना सोमवारी रात्री अटक केली असून, त्यांना लातूरच्या न्यायालयात मंगळवारी हजर केले असता न्यायालयाने २२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनास्थळी शहर उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत ढवळे यांनी भेट देऊन पाहणी केली.