धनेगाव बंधाऱ्याची तीन दारे उघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:24 AM2021-09-06T04:24:26+5:302021-09-06T04:24:26+5:30
देवणी तालुक्यात शनिवारी दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर जोरदार पाऊस सुरु होता. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारीही पावसाच्या ...
देवणी तालुक्यात शनिवारी दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर जोरदार पाऊस सुरु होता. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारीही पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे शेत शिवारात पाणीच पाणी पहावयास मिळत होते. या पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे. धनेगाव बंधाऱ्याच्या वरील बाजूस असलेल्या डोंगरगाव बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे धनेगाव बंधाऱ्याचे तीन दरवाजे प्रत्येकी एक मीटरने उघडण्यात येऊन पाणी सोडून देण्यात आले आहे.
देवणी तालुक्यात तीन महसूल मंडळे असून देवणी मंडळात १०६, बोरोळ ११२ आणि वलांडी मंडळात ११० मि.मी. पाऊस झाल्याची नोंद महसूल प्रशासनाकडे झाली आहे. तालुक्यात सरासरी १०९.३३ मि.मी. पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. पहिल्यांदाच मांजरा नदी वाहती झाली आहे.
नागरिकांनी सतर्क रहावे...
यंदा धनेगाव उच्चस्तरीय बंधाऱ्यात ८ मीटर पाणीसाठा करण्यात येणार आहे. धरण क्षेत्राच्या वरील बाजूस असलेल्या डोंगरगाव उच्चस्तरीय बंधाऱ्यातून शनिवारी पाणी सोडण्यात आल्याने धनेगाव उच्चस्तरीय बंधाऱ्याचे तीन दरवाजे प्रत्येकी एक मीटरने उघडण्यात आले आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता एम.एम. पाटील यांनी दिली. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.