चोरीसाठी दबा धरलेल्या तिघांना शस्त्रासह अटक; मुरुड पाेलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 09:05 PM2024-03-30T21:05:03+5:302024-03-30T21:05:54+5:30
पहाटेची घटना : मुरुड पाेलिसांची कारवाई
राजकुमार जाेंधळे
लातूर : चाेरी करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या तिघा सराईताना पाेलिसांनी घातक शस्त्रासह अटक केली असून, याबाबत मुरुड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मुरुड पाेलिसांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास केली.
पाेलिसांनी सांगितले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस ठाण्यांच्या स्तरावर रेकाॅर्डवरील गुन्हेगार, फरार गुन्हेगार आणि इतर गुन्ह्यातील आराेपींविराेधात कारवाईचा बडगा उगारला जात आहे. निवडणुकीचा शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत. त्या-त्या पाेलिस ठाण्याच्या हद्दीत त्या-त्या गस्त घातली जात आहे. गुन्हेगारांना ताब्यात घेतले जात असून, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. मुरुड ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्या पथकाकडून गस्त घातली जात हाेती. दरम्यान, शनिवारी रात्री १ ते ३ वाजण्याच्या सुमारास काही व्यक्ती चोरी करण्याच्या उद्देशाने मुरुड शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे अस्तित्व लपवून अंधारात दबा धरून बसल्याचे पोलिस गस्तीवरील पाेलिसांच्या निदर्शनास आले. दबा धरून बसलेल्या तिघांना ताब्यात घेत लोखंडी खंजीर, तलवारसह घातक शस्त्र जप्त केले. अधिक चौकशी केली असता ते सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर लातुरातील विविध पोलिस ठाण्यात चोरी, जबरी चोरी, दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समाेर आले आहे. मैनुद्दीन इरफान पठाण (२४, रा. बरकत नगर, लातूर), चंद्रकांत अंबादास जाधव (३५, रा. दीपज्योती नगर, लातूर) आणि नागेश बब्रुवान थोरात (४०, रा. सैनिकपुरी पाटी, खाडगाव रोड, लातूर) असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
ही कारवाई सपोनि. व्यंकटेश आलेवार, सहायक फाैजदार चव्हाण, पाेलिस कर्मचारी बोईनवाड, सूर्यवंशी, तिगिले, शिंदे, मस्के, कुंभार, भोसले, रवि कांबळे, किर्ते, खुमसे यांच्या पथकाने केली आहे.