अहमदपूर आगाराला दररोज तीन लाखांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:24 AM2021-08-12T04:24:23+5:302021-08-12T04:24:23+5:30
प्रवाशांच्या सेवेसाठी असे ध्येय उराशी बाळगून कार्यरत असलेले एसटी महामंडळाच्या बसेसची कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवाशी संख्या काही प्रमाणात घटली आहे. ...
प्रवाशांच्या सेवेसाठी असे ध्येय उराशी बाळगून कार्यरत असलेले एसटी महामंडळाच्या बसेसची कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवाशी संख्या काही प्रमाणात घटली आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या कालावधीत तर बससेवा पूर्णपणे बंद होती. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लांबपल्ल्यासह ग्रामीण भागातील विविध मार्गावर बसेस धावू लागल्या आहेत.
अहमदपूर आगारात एकूण ७८ बसेस आहेत. या बसेस दररोज २२ हजार किमी धावतात. आगारात एकूण ४८९ कर्मचारी आहेत. त्यात वाहक २१०, चालक १७९ व अन्य कर्मचारी आहेत. येथील आगारातून दररोज अहमदपूर- लातूर मार्गावर १० बसेस ६० फेऱ्या करतात. तसेच उदगीर मार्गावर ६ गाड्या धावत असून ४८ फेऱ्या होतात. मुखेड मार्गावर ४ बसेस धावतात. त्यांच्या ३२ फेऱ्या हाेतात. गंगाखेड मार्गावर २ बसेसच्या १४ फेऱ्या होतात. अंबाजोगाई मार्गावर ५ गाड्या असून ३० फेऱ्या होतात.
पुण्यासाठी ५, सोलापूरसाठी ४, अक्कलकोट, बुलडाणा, औरंगाबाद, पंढरपूरसाठी प्रत्येकी एक तर ग्रामीण भागात १६ बसेस धावतात. या सर्व बसेसमधून एकूण सरासरी १५ हजार ५१५ प्रवासी प्रवास करतात. या सर्व गाड्यांसाठी दररोज ५ हजार लिटर डिझेल लागते. सध्या डिझेलचे भाव वाढल्याने त्याचा आर्थिक भार एसटी महामंडळावर पडत आहे. त्यातच काही मार्गावर अल्प प्रमाणात प्रवाशी मिळतात. त्यामुळे एसटी महामंडळाच्या अहमदपूर आगाराला दररोज जवळपास तीन लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे.
दररोज ६ लाखांचे उत्पन्न...
अहमदपूर आगारास दररोज सरासरी ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. परंतु, सध्या ६ लाखापर्यंत उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे दिवसाकाठी ३ लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून प्रवाशी संख्या रोडावली आहे. त्यातच डिझेलचे भाव वाढले आहेत. त्यामुळे हा फटका सहन करावा लागत आहे. प्रवाशी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
- शंकर सोनवणे, आगारप्रमुख, अहमदपूर.