दमदाटी करून माेबाइल हिसकावणाऱ्या टोळीतील आणखी तिघांना अटक
By राजकुमार जोंधळे | Published: November 8, 2022 07:59 PM2022-11-08T19:59:28+5:302022-11-08T19:59:40+5:30
लातुरात कारवाई : दुचाकी, माेबाइलसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर : शहरात विविध भागांमध्ये दमदाटी करून जबरदस्तीने माेबाइल हिसकावत पळ काढणाऱ्या टाेळीतील अजून तिघांना शिवाजीनगर ठाण्याच्या पाेलीस पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चाेरीतील दुचाकी, माेबाइलसह पाच लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील विविध भागात पाठीमागून येत दमदाटी करत जबरदस्तीने मोबाइल हिसकावून पलायन करणाऱ्या आणि शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात दाखल असलेल्या दाेन चाेरीच्या गुन्ह्याचा तपास पाेलीस पथकाकडून केला जात हाेता. दरम्यान, याबाबत खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी संशयित म्हणून तिघांना ताब्यात घेतले. अधिक चाैकशी केली असता त्यांनी आपली नावे प्रफुल प्रकाश पवार (२३, रा. गिरवलकरनगर, लातूर), विशाल विष्णू जाधव, (२६, रा. पंचवटीनगर, लातूर) आणि महेश नामदेवराव नरहारे (२०, रा. महाळंग्रा, ता. चाकूर) अशी सांगितली. ताब्यातील तिघांनी लातुरात दमदाटी करून माेबाइल हिसकावत पळ काढल्याची कबुली दिली आहे. चाेरीतील २२ माेबाइल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी त्यांनी पाेलिसांसमाेर हजर केली असून, ताे मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. अटकेतील तिघांकडून माेबाइल, दुचाकीसह ५ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पाेलीस अधीक्षक साेमय मुंडे, अपर पाेलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप डोलारे, पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, युवराज गिरी, गोविंद चामे, काकासाहेब बोचरे, सिद्धेश्वर मदने, नीलेश जाधव यांच्या पथकाने केली.
यापूर्वीही केली दाेघांना अटक...
तीन दिवसांपूर्वीच माेबाइल हिसकावणाऱ्या दाेघांना अटक करून, त्यांच्याकडून माेबाइल, दुचाकीसह ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला हाेता.