विवाह समारंभ आटोपून परतताना कारचा भीषण अपघात, मामासह तीन भाचे ठार
By हरी मोकाशे | Published: March 27, 2023 05:31 PM2023-03-27T17:31:54+5:302023-03-27T17:32:50+5:30
चलबुर्गा पाटीजवळील घटना : दोघे गंभीर जखमी
निलंगा/ औसा/ किल्लारी (जि. लातूर) : मामाचा विवाह समारंभ आटोपून गावाकडे परतताना भरधाव वेगातील कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने औसा- निलंगा मार्गावरील चलबुर्गा पाटीजवळ सोमवारी सकाळी ७ वाजता भीषण अपघात झाला. यात मामासह तीन भाचे जागीच ठार झाले तर चौघे जखमी झाले. त्यातील दोघे गंभीर आहेत.
अंश किरण बडूरकर (१०), जय सचिन बडूरकर (१०), अमर सचिन बडूरकर (१५, सर्वजण रा. दत्तनगर, निलंगा), प्रकाश लक्ष्मण कांबळे (२७, रा. हालसी तुगाव, ता. निलंगा) असे मयत झालेल्या चौघांची नावे आहेत.
निलंगा तालुक्यातील हलसी तुगाव येथील आकाश लक्ष्मण कांबळे यांचा विवाह रविवारी पुण्यातील मुळशी येथे होता. त्यासाठी निलंग्यातील बडूरकर कुटुंबिय गेले होते. विवाह समारंभ पार पडल्यानंतर सचिन डिगंबर बडूरकर, गोदावरी सचिन बडूरकर, जान्हवी सचिन बडूरकर, यश किरण बडूरकर, अमर सचिन बडूरकर, जय सचिन बडूरकर, अंश किरण बडूरकर आणि प्रकाश लक्ष्मण कांबळे (रा. हालसी तुगाव) हे कार (एमएच २४, एएफ ७०५०) ने सोलापूर- औसा मार्गे निलंग्याकडे परतत होते. ही कार सोमवारी सकाळी ७ वा.च्या सुमारास चलबुर्गा पाटीजवळ पोहोचली असता अचानकपणे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार पुलाच्या बाजूस असलेल्या खोल खड्ड्यात जावून उलटली.
या भीषण अपघातात अंश बडूरकर, जय बडूरकर, अमर बडूरकर आणि मामा प्रकाश कांबळे हे जागीच ठार झाले. या अपघातात गोदावरी बडूरकर, जान्हवी बडूरकर ह्या गंभीर जखमी असून त्यांच्यावर लातुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सचिन बडूरकर, यश बडूरकर हे जखमी झाले आहेत.
कार पुलाच्या नजिकच्या खड्ड्यात कोसळली...
भरधाव वेगातील कार चालकाचा ताबा सुटल्याने ही कार औसा- निलंगा मार्गावरील चलबुर्गा पाटीजवळील पुलाच्या बाजूस असलेल्या १५ ते २० फुट खोल असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटली. यात कारचा चक्काचूर झाला आहे.
मृतात तीन भावंडांचा समावेश...
या अपघातात दोन सख्ख्या व एका चुलत भावाचा आणि मामाचा मृत्यू झाला आहे. आई- वडिलांसह एक भाऊ व बहिण जखमी झाली आहे.
अपघातस्थळी किंचाळ्याच किंचाळ्या...सकाळच्या वेळी या मार्गावर शांतता असते. मात्र, हा अपघात घडल्याने जोरदार किंचाळ्या आणि रडण्याबरोबरच वाचवा वाचवा असा आवाज येत होता. हे ऐकून या मार्गावरुन ये- जा करणाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली. कारमधील सर्वांना वाहनाबाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे औश्यातील रुग्णालयात पाठविले. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक नाना लिंगे, आबा इंगळे, जमादार आर. बी. साळुंके, सचिन उस्तुर्गे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मदत केली.
बडूरकर- कांबळे कुटुंबावर शोककळा...
विवाह सोहळ्याच्या आनंदात बडुरकर कुटुंबिय गावाकडे परतत होते. तेव्हा हा अपघात घडला. त्यामुळे काही क्षणातच दु:खाचा डोंगर निर्माण झाला. या घटनेमुळे बडूरकर, कांबळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. औश्याच्या ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश पाहून हृदय हेलावत होते.