लातूर जिल्हा परिषदेसह तीन पंचायत समित्यांना पाऊण कोटीची बक्षिसे
By हरी मोकाशे | Updated: March 5, 2024 19:09 IST2024-03-05T19:09:29+5:302024-03-05T19:09:45+5:30
एकूण ७३ लाखांची बक्षिसे जिल्ह्याने मिळविली आहेत.

लातूर जिल्हा परिषदेसह तीन पंचायत समित्यांना पाऊण कोटीची बक्षिसे
लातूर: यशवंत पंचायतराज अभियानात लातूर जिल्हा परिषदेसह लातूर, शिरूर अनंतपाळ आणि जळकोट पंचायत समितीने उत्कृष्ट कार्य केल्याने मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे गौरव करण्यात आला. एकूण ७३ लाखांची बक्षिसे जिल्ह्याने मिळविली आहेत.
विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड, उपायुक्त सुरेश बेदमुथा, सहाय्यक आयुक्त सीमा जगताप यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके, जळकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नरेंद्र मेढेवार, जि.प. चे सहाय्यक प्रशासन अधिकारी बादने, दयानंद माने आदींनी पुरस्कार स्वीकारला.
यशवंत पंचायतराज अभियानात सन २०२०-२१ मध्ये लातूर पंचायत समितीने विभागात प्रथम तर शिरूर अनंतपाळ पंचायत समितीने विभागात तृतीय क्रमांक मिळविला होता. त्यांना अनुक्रमे प्रत्येकी ११ लाख व ६ लाखांचे पारितोषिक जाहीर झाले होते.
तसेच सन २०२२-२३ मध्ये लातूर जिल्हा परिषदेने राज्यस्तरावर तृतीय (१७ लाख), लातूर पंचायत समितीने राज्यस्तरावर प्रथम (२० लाख) आणि विभाग स्तरावर प्रथम (११ लाख) तसेच जळकोट पंचायत समितीने विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक (८ लाख) मिळविला होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उत्कृष्ट कार्याबद्दल कौतुक होत आहे.