जन्मदात्यांच्या डाेळ्यासमाेरच पाझर तलावामध्ये तिघे बुडाले!
By राजकुमार जोंधळे | Published: March 5, 2023 09:44 PM2023-03-05T21:44:01+5:302023-03-05T21:44:56+5:30
दाेघांना वाचविण्यात यश, तर चार वर्षीय चिमुकला बुडाला...
राजकुमार जाेंधळे, लातूर: शहरालगत असलेल्या खाडगाव, पाखरसांगवी आणि वासनगाव सीमेवरील एका पाझर तलावात ऊसताेड कामगाराच्या डाेळ्यासमाेरच पाेटचे तीन मुले बुडाली. यावेळी वडिलांनी जिवाच्या आकांताने दाेघा मुलांना वाचविले. मात्र, चार वर्षीय चिमुकला डाेळ्यासमाेरच बुडाला. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. चार वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह तलावाबाहेर काढण्यात पाेलिसांना रविवारी सायंकाळी यश आले. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात रात्री उशिरा घटनेची नाेंद करण्यात आली.
पाेलिसांनी सांगितले, यवतमाळ जिल्ह्यातील सेवानगर (ता. माहागाव) येथील उसताेड कामगार शिवदास रामधन चव्हाण (वय ४०) हे खाडगाव शिवारातील विकास दगडू साळुंके यांच्या शेतात ऊसताेडीचे काम करत हाेते. दरम्यान, शनिवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास ते शेतानजीक असलेल्या पाझर तलावाकडे सरपण गाेळा करण्यासाठी गेले. यावेळी कृष्णा शिवदास चव्हाण (वय १०), बालाजी चव्हाण (वय ७) आणि अजय चव्हाण (वय ४) हे तीन मुले पाठीमागे गेले. शिवदास चव्हाण हे सरपण गाेळा करत हाेते. मात्र, मुले अचानक दिसत नसल्याने ते इकडे-तिकडे पाहिले, तर तिघेही पाझर तलावात पडल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने तलावात उडी घेत मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यात कृष्णा आणि बालाजीला वाचिवण्यात यश आले. तर चारवर्षीय अजय डाेळ्यासाेमर पाण्यात बुडाला. वडिलांनी त्यालाही वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते प्रयत्न अपयशी ठरले. याबाबतची माहिती लातूर एमआयडीसी पाेलिसांना देण्यात आली. पाेलिसांनी तातडीने तलावाकडे धाव घेत शाेधकार्य सुरू केले.
२४ तासांच्या प्रयत्नानंतर चिमुकल्याचा मृतदेह हाती...
शनिवारी सायंकाळपर्यंत चिमुकल्या अजयचा मृतदेह हाती लागला नव्हता. रात्र झाल्याने शाेध माेहीम थांबविण्यात आली. रविवारी सकाळी पुन्हा शाेधकार्याला सुरुवात झाली, सायंकाळच्या सुमारास मृतदेहाला पाण्याबाहेर काढण्यात पाेलिसांना यश आले. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात वडिल शिवदास चव्हाण यांनी दिलेल्या माहितीवरून रविवारी रात्री उशिरा नाेंद करण्यात आली आहे अशी माहिती पाेलिस निरीक्षक गाेरख दिवे यांनी दिली.