चोरीकरून निघाले देवदर्शनाला, लातूर पोलिसांच्या नाकाबंदीत तीन दरोडेखोर अडकले
By राजकुमार जोंधळे | Published: August 16, 2022 08:26 PM2022-08-16T20:26:47+5:302022-08-16T20:27:51+5:30
ट्रॅव्हल्सने तिरुपतीला निघाले होते, न्यायालयाने सुनावली चार दिवसांची पोलीस कोठडी
लातूर : एमआयडीसी परिसरातील एका वेअर हाऊसवर दरोडा टाकून १४० कट्टे सोयाबीन पळविणाऱ्या टोळीतील तिघांना ट्रॅव्हल्स भाड्याने करून तिरुपतीला देव दर्शनासाठी जाताना लातुरात नाकाबंदी करुन पकडण्यात आले आहे. तिघांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील एकूण आठ आरोपीपैकी पाच जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, लातूरतील एमआयडीसी परिसरात असलेले एक वेअर हाऊस एक महिन्यापूर्वी तर- ढोकी परिसरात वास्तव्याला असलेल्या अट्टल आरोपीनी फोडले होते. दरम्यान, वेअर हाऊसमध्ये ठेवण्यात आलेले १४० कट्टे सोयाबीन पळविले होते. याबाबत लातूरतील एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकूण आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील पाच जणांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य तिघेजण पोलिसांना चकवा देत जागा बदलत फिरत होते. उस्मानाबाद येथील एक ट्रॅव्हल्स भाड्याने करून ते तिरुपतीला देवदर्शनासाठी जात असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली.
नाकाबंदीत अडकली ट्रॅव्हल्स...
दरम्यान, पोलिसांनी ढोकी, मुरुड आणि लातुरात बार्शी रोडवर नाकाबंदी केली. यावेळी येणाऱ्या प्रत्येक वाहनांची झाडाझडती घेतली. अखेर बार्शी मार्गावरून ट्रॅव्हल्सला रोखत ती ठाण्यात आणण्यात आली. यातील अनिल बाप्पा काळे, आकाश उर्फ तोब्या मधू पवार आणि राहुल तानाजी पवार (सर्व रा. पळसप ता. जि. उस्मानाबाद) यांना अटक करण्यात आली. त्यांना लातूरच्या न्यायालयात मंगळवारी हजर केले असता, न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप कराड करत आहेत.