औरंगाबाद-वाळूज मार्गावर तीन मजली पूल; विविध महामार्ग मराठवड्याला जोडणार - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 01:29 PM2021-11-26T13:29:17+5:302021-11-26T13:34:10+5:30
यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, देश आणि राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांचे रस्ते दर्जेदार केले जात आहेत. लातूर जिल्ह्यातही सुमारे ५ हजार कोटींची कामे मंजूर असून, आणखी तीन-चार हजार कोटींची कामे होतील. लातूर-टेंभुर्णी मार्गाचे चौपदरीकरण केले जाईल. त्यासाठीचे वार्षिक नियोजनही तातडीने होईल.
लातूर : सुरत, चेन्नई, हैदराबाद जाणारे वेगवेगळे महामार्ग मराठवाड्याला जोडण्याचा प्रयत्न असून, पुणे-शिरूरच्या धर्तीवर औरंगाबाद-वाळूज जाणारा मार्ग तीन मजली पुलाचा असेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी येथे दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे झालेल्या १९ प्रकल्पांच्या लोकार्पण व भूमिपूजनप्रसंगी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मराठवाड्यातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्याची भूमिका मांडली.
यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, देश आणि राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांचे रस्ते दर्जेदार केले जात आहेत. लातूर जिल्ह्यातही सुमारे ५ हजार कोटींची कामे मंजूर असून, आणखी तीन-चार हजार कोटींची कामे होतील. लातूर-टेंभुर्णी मार्गाचे चौपदरीकरण केले जाईल. त्यासाठीचे वार्षिक नियोजनही तातडीने होईल.
लातूरमध्ये दहापेक्षा अधिक साखर कारखाने आहेत. सोयाबीन उत्पादन आहे. त्यामुळे इथेनॉल उत्पादनात हा जिल्हा अग्रेसर व्हावा. शेतकरी ऊर्जादाता व्हावा, अशी अपेक्षाही गडकरी यांनी व्यक्त केली. या रस्त्यांच्या जाळ्यामुळे मराठवाड्याचा विकास होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
‘खासगी तत्त्वावर सुरु करणार मेट्रो’
लातूरला ब्राॅडगेज आहे. त्याचा उपयोग करून खासगी तत्त्वावर शेजारील जिल्हे, राज्यांना जोडणारी मेट्रो सुरू करण्याचा प्रयत्न करावा, असा विचारही गडकरी यांनी मांडला.