शिक्षण सोडून मौजमजेसाठी बनले चैनस्नॅचर, हॉस्टेलवरील तीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

By आशपाक पठाण | Published: December 26, 2023 06:24 PM2023-12-26T18:24:07+5:302023-12-26T18:24:36+5:30

गंठण चोरणारे तीन अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात, विवेकानंद चौक पोलिसांची कारवाई

Three students living in a hostel who abandoned their studies and became chain-snatchers for fun are in police custody | शिक्षण सोडून मौजमजेसाठी बनले चैनस्नॅचर, हॉस्टेलवरील तीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

शिक्षण सोडून मौजमजेसाठी बनले चैनस्नॅचर, हॉस्टेलवरील तीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

लातूर : शहरातील विवेकानंद चौक हद्दीतील विराट नगर भागातून एका महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावण्यात आल्याची घटना १९ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी तपास करून आज अल्पवयीन तीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याडून जवळपास ९० हजारांचा मुद्देमाल मंगळवारी जप्त केला आहे.

पोलिसांनी सांगितले, विराट नगर परिसरातून एका महिलाच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण अज्ञात आरोपींनी जबरदस्तीने हिसकावल्याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला होता. विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चोरलेले सोने विकण्याच्या तयारीत असलेल्या तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन चौकशी करण्यात आली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. तिन्ही विधीसंघर्ष बालकाकडून चोरीतील मिनी गंठण जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.डी. लिंगे करीत आहेत.

मौजमजेसाठी विद्यार्थ्यांनी केली चोरी...
लातूरमध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले तिन्ही मुले एका हॉस्टेलमध्ये राहतात. नवीन मोबाईल घेण्यासाठी व मौजमजा करण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी घरासमोर शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील गंठण बळजबरीने हिसकावून घेऊन ही मुले पळून गेली होती. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चोरीतील मुद्देमाल जप्त केला. तसेच नमूद तीन विधी संघर्ष बालकांकडून गुन्ह्यात चोरलेला सोन्याचा मिनीगंठण जप्त करण्यात आला आहे. सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.डी.लिंगे, पोलीस अमलदार विनोद चलवाड, अतुल काळे यांनी केली आहे.

Web Title: Three students living in a hostel who abandoned their studies and became chain-snatchers for fun are in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.