एक हजाराची लाच घेणाऱ्या लिपिकाला तीन वर्षांची शिक्षा; लातूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
By राजकुमार जोंधळे | Updated: April 21, 2025 21:09 IST2025-04-21T21:09:18+5:302025-04-21T21:09:42+5:30
तक्रारदाराने रीतसर लागणारी स्टॅम्प ड्यूटी चलनाद्वारे भरली हाेती. भरलेली पावती जमा करुनही दस्त देण्याच्या कामासाठी जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक विष्णू तुळशीदास काळे (वय ३४) याने त्यांच्याकडे एक हजाराच्या लाचेची मागणी केली होती.

एक हजाराची लाच घेणाऱ्या लिपिकाला तीन वर्षांची शिक्षा; लातूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
लातूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुद्रांक दस्तची नाेंदणी करुन देण्यासाठी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती घेणाऱ्या कनिष्ठ लिपिकाला लातूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय क्र. १ न्यायाधीश आर.बी. राेटे यांनी साेमवारी तीन वर्षांचा कारावास व पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील विठ्ठल देशपांडे यांनी सांगितले, तक्रारदाराने १३ डिसेंबर २०१६ राेजी अहमदपूर एमआयडीसीकडून भाडेपट्टा करण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे दस्त अभिनिर्णयासाठी दाखल केला हाेता. दरम्यान, स्टॅम्प ड्यूटी भरुन दस्त लातूर एमआयडीसी कार्यालयात सादर करायचा हाेता. तक्रारदाराने रीतसर लागणारी स्टॅम्प ड्यूटी चलनाद्वारे भरली हाेती. भरलेली पावती जमा करुनही दस्त देण्याच्या कामासाठी जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक विष्णू तुळशीदास काळे (वय ३४) याने त्यांच्याकडे एक हजाराच्या लाचेची मागणी केली होती.
याबाबत लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ५ जानेवारी २०१७ राेजी पथकाने सापळा लावला. पंचासमक्ष एक हजाराची लाच घेताना कनिष्ठ लिपिक काळे याला पकडले. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. तपास करुन लातूर न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले. युक्तिवाद, साक्ष आणि दाखल सबळ पुरावे महत्वपूर्ण ठरले. सुनावणीअंती दाेषी ठरलेल्या लिपिक विष्णू काळे याला न्यायाधीश आर.बी. राेटे यांनी तीन वर्षांचा कारावास, पाच हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
या खटल्यामध्ये सरकारच्या पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील विठ्ठल व्ही. देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना सहायक वकील परमेश्वर तल्लेवाड यांनी सहकार्य केले. लातूर एसीबीचे पाेलिस उपाधीक्षक संताेष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली काेर्ट पैरवी पाे.नि. अन्वर मुजावर, अंमलदार भावत कटारे, असलम सय्यद, फारुक दामटे, भीमराव आलुरे यांनी केली.