वेळा अमावस्यानिमित्त चाकरमान्यांना ओढ गावच्या मातीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:49 AM2021-01-13T04:49:28+5:302021-01-13T04:49:28+5:30
उदगीर : महाराष्ट्र- कर्नाटक व तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील गावांत मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या ही वेळा अमावस्या म्हणून साजरी केली जाते. ...
उदगीर : महाराष्ट्र- कर्नाटक व तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील गावांत मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या ही वेळा अमावस्या म्हणून साजरी केली जाते. या सणाला खूप महत्व आहे. या सणानिमित्ताने माती व संस्कृतीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नोकरी व कामधंद्यासाठी बाहेरगावी असलेली मंडळी सहकुटुंब गावची वाट धरतात. चाकरमान्यांना या सणासाठी गावची ओढ लागते. त्यामुळे मंगळवारी लातूर जिल्ह्यासह, उस्मानाबाद, बीड, कर्नाटक व तेलंगणातील शेत- शिवार माणसांनी फुलणार आहेत.
ग्रामीण भागात येळवस असे म्हटले जाते. यंदा हा सण जानेवारीत साजरा होत आहे. मुळात हा सण कर्नाटकातला असता तरी मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद व पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर तसेच तेलंगणा व सीमाभागातील कांही गावात हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात. कृषी संस्कृतीशी या सणाचे जवळचे नाते आहे. सणादिवशी शहर व ग्रामीण भागात एकप्रकारे अघोषित संचार बंदीचं असते.
रब्बी हंगामातील पिके बहरलेली असतात. त्यामुळे शेतशिवारं हिरवागार असतो. या सणासाठी बाहेरगावी राहणारी मंडळी शेताकडे येण्याचा प्रयत्न करतात. शेजारी, मित्रपरिवारांना जेवणाचे निमंत्रण दिले जाते. जेवणात भज्जी, रोडगा, अंब्बील, खिचडा गोड भात हा मेनू असतो. विशेषत: ज्यांच्याकडे शेती नाही, जे दुसऱ्या गावात स्थायिक झालेले आहेत, अशांना आवर्जून शिवारात भोजनासाठी निमंत्रण दिले जाते.
कडब्याच्या कोपीत पांडवांची पूजा
सकाळपासून बळीराजा साहित्य घेऊन शेतात जातात. पूर्वी सर्वजण बैलगाडीने जायचे. आता बैलगाडीची जागा दुचाकी, ट्रॅक्टर, कार, टेम्पो आदींनी घेतली आहे. शेतात पाच कडब्याच्या पेंड्या उभ्या करुन कोप तयार केली जाते. ती कोप म्हणजे आधार व सावलीचे प्रतीक होय. पांडव लक्ष्मीला दैवत मानून पूजा केली जाते. बळीराजा सपत्नीक पूजा करुन कोपीच्याभोवती ओलगे ओलगे सालम पलगे म्हणत फेऱ्या मारतो.