उदगीरच्या मार्केटयार्डसाठी ५० एकर जागा मिळवून देणार; दिलीपराव देशमुख यांची ग्वाही
By संदीप शिंदे | Published: August 10, 2023 07:28 PM2023-08-10T19:28:39+5:302023-08-10T19:29:04+5:30
उदगीर येथे शेतकरी, हमाल, मापाडी व नूतन संचालकांच्या वतीने आयोजित स्नेह व ऋणनिर्देश मेळाव्यात माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते.
उदगीर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत चालणाऱ्या मार्केटयार्डसाठी आगामी काळात ५० एकर जमीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी बुधवारी येथे दिली.
उदगीर येथे शेतकरी, हमाल, मापाडी व नूतन संचालकांच्या वतीने आयोजित स्नेह व ऋणनिर्देश मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर माजी मंत्री आ. अमित देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन आ. धीरज देशमुख, माजी आ. त्र्यंबक भिसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, ‘रेणा’चे चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेच्या संचालिका लक्ष्मीताई भोसले, ॲड. प्रमोद जाधव, रवींद्र काळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजी मुळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याणराव पाटील, उषाताई कांबळे, सभापती शिवाजी हुडे, उपसभापती प्रीती भोसले, मंजूरखाँ पठाण, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटूरे, मारोती पांडे आदींसह संचालक उपस्थित होते.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले, देशाची प्रगती काँग्रेस पक्षाने केली. लोकशाही जिवंत ठेवण्याचे कार्य काँग्रेसने केली असून, ते जपायची जबाबदारी तुम्हा-आम्हावर आली आहे. सध्याचे वातावरण पाहता नागरिकांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतला तरच लोकशाही अस्तित्वात राहील, असेही ते म्हणाले. यावेळी बाजार समितीकडून शेतकऱ्यांच्या घरी जन्मास येणाऱ्या मुलीच्या नावाने राष्ट्रीय बँकेत पाच हजार रुपयांची ठेव मुलीच्या १८ वर्षांपर्यंत ठेवण्यासाठी वैशालीताई देशमुख बालिका बचाव योजना मान्यवरांच्या हस्ते सुुरू करण्यात आली. प्रास्ताविकात सभापती शिवाजी हुडे यांनी बाजार समितीकडून १ हजार ८९७ जणांना लाभ दिल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. गोविंद भालेराव व संचालक ॲड. पद्माकर उगिले यांनी केले. आभार संचालक मधुकर एकुर्केकर यांनी मानले.
लोकशाहीत इमान राखणे गरजेचे...
आज राज्यात विचारांशी एकनिष्ठ नसलेला महाराष्ट्र दिसत आहे. मतदाराला गृहीत धरून विचारांना सोडचिठ्ठी देण्याचे काम लोकप्रतिनिधींकडून होत आहे. लोकशाहीत लोकांशी इमान राखणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्षाने सामान्य माणसांशी असलेली बांधिलकी जपली आहे. उदगीर व जळकोट तालुक्यांत महाविकास आघाडी विचाराचा आजही मतदार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने काम करून बहुमत मिळवावे, असेही माजी मंत्री आ. अमित देशमुख म्हणाले.
कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर काम करावे...
काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर काम करीत राहावे. त्यामुळे सामान्य जनतेशी, पक्षांच्या विचारांची नाळ कायम राहते. सर्वसामान्यांच्या विकासासाठी व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काँग्रेस पक्षाचे फार मोठे योगदान आहे. जिल्हा बँक, मांजरा परिवारातील साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्याचे काम झाले असल्याचे जिल्हा बँकेचे चेअरमन आ. धीरज देशमुख म्हणाले.