लातूरच्या पाण्यासाठी रेल्वेची आज दुसरी खेप
By admin | Published: April 13, 2016 12:23 AM2016-04-13T00:23:07+5:302016-04-13T00:43:08+5:30
मिरजेत तयारी : पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर
मिरज : मिरजेतून सोमवारी १० टँकर लातूरला पाठविल्यानंतर आणखी दहा टँकरची पाणी एक्स्प्रेस बुधवारी सकाळी लातूरला जाणार आहे. लातूरला पाणीपुरवठ्यासाठी मिरज रेल्वेयार्डापर्यंत पाईपलाईनचे काम युध्दपातळीवर करण्यात येत असून, शनिवारपासून ५० टँकर भरून रेल्वे लातूरला जाणार आहे. लातूरला पाणी पुरवठ्यासाठी २५ लाख लिटर क्षमतेचे ५० टँकर भरण्यासाठी रेल्वेच्या जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता वाढविण्याचे व रेल्वे यार्डापर्यंत पाईपलाईनचे १ कोटी ८४ लाख रुपये खर्चाचे काम युध्दपातळीवर करण्यात येत आहे. चार जेसीबी व १०० मजुरांच्या साहाय्याने अडीच किलोमीटर लांब नवीन पाईपलाईनचे काम शुक्रवारपर्यंत पूर्ण होणार असल्याचे जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेस्थानकातील यंत्रणेव्दारे पाणी भरण्याची गती अत्यंत कमी असल्याने केवळ दहा टँकर भरून लातूरला पाठविण्यात येत आहेत.
सोमवारी दहा टँकरने सुमारे ५ लाख ४० हजार लिटर पाणी लातूरला रवाना झाले. त्यानंतर आणखी १० टँकर भरण्याचे काम मंगळवारी दिवसभर रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म दोनवर सुरू होते. टँकर भरण्याचे काम पहाटेपर्यंत पूर्ण झाल्यास उद्या बुधवारी सकाळी लातूरला पाणी पाठविण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आणखी पन्नास टॅँकरची रेल्वे येणार
पन्नास टॅँकर असलेली रेल्वे सध्या मिरजेत आहे. सध्या यातील दहा टॅँकरचाच वापर होत आहे. शनिवारपासून पूर्ण क्षमतेने ५० टॅँकर लातूरला जाणार आहेत. एक रेल्वे लातूरला रवाना झाल्यानंतर दुसरी रेल्वे पाणी भरण्यासाठी असायला हवी. तरच दररोज लातूरला पाणीपुरवठा करता येणार आहे. त्यामुळे आणखी पन्नास टॅँकरची रेल्वे बुधवारी मिरजेत दाखल होणार आहे. म्हणजे एकूण १०० रेल्वे टॅँकर उपलब्ध होणार आहेत.