ठोकमध्ये टोमॅटो तीन रुपये किलो, भाव घसरल्याने तोंडणी बंद; शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात

By संदीप शिंदे | Published: October 10, 2023 05:58 PM2023-10-10T17:58:30+5:302023-10-10T17:59:09+5:30

कमी भाव मिळू लागल्याने टोमॅटोचा उत्पादन खर्च निघणे दूरच, साधा वाहतूक खर्चदेखील निघणे मुश्कील झाले आहे.

Tomatoes in Thok at Rs 3 per kg, due to fall in prices, mouth closed; Farmers in economic crisis again | ठोकमध्ये टोमॅटो तीन रुपये किलो, भाव घसरल्याने तोंडणी बंद; शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात

ठोकमध्ये टोमॅटो तीन रुपये किलो, भाव घसरल्याने तोंडणी बंद; शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात

चाकूर ( लातूर) : तालुक्यात टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे दर घसरले आहेत. ठोकमध्ये तीन ते चार रुपये किलो दराने टोमॅटोला भाव मिळत असून, तोडणीसाठीची मजुरी आणि बाजारात नेणे याचाही खर्च निघत नसल्याने तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटो तोडणीच थांबविली आहे. पुन्हा एकदा दर घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

लाल टोमॅटो बाजारात १० रुपये किलो दराने विकले जात आहेत. तरी त्याला मागणी अधिक नसल्याने टोमॅटो काढणीसाठी सध्या मजूर हजेरी जास्त मागत आहेत. ती देऊन टोमॅटो काढून विक्रीसाठी आणणे शेतकरी वर्गाला परवडत नाही. यामुळे शेतकरी टोमॅटो काढून बांधावर फेकून देत आहे. काही दिवस टोमॅटोला भाव चांगले होते. त्यामुळे नगदीचे पीक म्हणून शेतकरी टोमॅटोकडे वळला. चाकूरसह तालुक्यातील वडवळ नागनाथ, लातूररोड, मोहनाळ, सावरगाव, कडमुळी, भाटसांगावी या गावच्या शिवारात टोमॅटोची सुमारे ११०० एकरवर लागवड आहे.

जून ते ऑगस्टमध्ये याची लागवड केली जाते. सध्या टोमॅटो तोडणीला आले आहेत. या भागातील टोमॅटो सध्या नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, हैदराबाद, आदिलाबाद, निजामाबाद या भागांत शेतकरी विक्रीसाठी नेतात. ३० किलोच्या क्रेटला ८० ते १२० पर्यंत भाव मिळत आहेत. त्यामुळे हातातोंडाला आलेला घास निव्वळ विक्रीतून चार पैसे मिळणार असताना बाजारात टोमॅटोचे भाव गडगडले असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. टोमॅटो तोडणीसाठी मजूर मिळेना, त्यातच वाहतूक करून मार्केटला नेण्याचा खर्च निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो तोडणी थांबविली आहे. त्यातच सप्टेंबर महिन्यात पुन्हा सुमारे ६०० एकर टोमॅटोची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.

उत्पादन खर्च दूरच, वाहतूक खर्चही निघेना...
कमी भाव मिळू लागल्याने टोमॅटोचा उत्पादन खर्च निघणे दूरच, साधा वाहतूक खर्चदेखील निघणे मुश्कील झाले आहे. यावर्षी टोमॅटोला चांगला भाव होता म्हणून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात टोमॅटोची लागवड केली. भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे. कमी भाव मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. त्यातच थोडाफार प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. आता जगावे कसा, असा प्रश्न आमच्यासमाेर पडला असल्याचे शेतकरी संग्राम मुंडे यांनी सांगितले.

उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा...
शेतीमाल काढण्यासाठी लागणारा खर्च आणि त्यातून काढलेल्या उत्पन्नाचा हिशोब केला तर उरलेल्या पैशातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे. शासनाने उत्पादन खर्चावर आधारित भाव देणे गरजेचे आहे. चाकूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. दर वाढले होते तेव्हा सोशल मीडियावर चर्चा होते. आता दर कमी झाले तर कोणीच बोलायला तयार नाही. शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी नागनाथ पाटील यांनी केली आहे.

Web Title: Tomatoes in Thok at Rs 3 per kg, due to fall in prices, mouth closed; Farmers in economic crisis again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.