प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; लातुरात आराेपीला १० वर्षांचा सश्रम कारावास, लाखाचा दंड
By राजकुमार जोंधळे | Published: September 18, 2024 10:37 PM2024-09-18T22:37:12+5:302024-09-18T22:37:32+5:30
लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
राजकुमार जाेंधळे, लातूर: वारंवार पाठलाग करुन, प्रेमाच्या जाळ्यात ओढून, लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणारा आराेपी समशेर सत्तार पठाण (रा. चंद्राेदय काॅलनी, लातूर) याला लातूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालाचे न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी बुधवारी दहा वर्षांचा सश्रम कारावास आणि एक लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
सन २०१५ मध्ये आराेपी समशेर पठाण याने पीडित मुलीवर अत्याचार करण्याच्या हेतुने तिचा सतत पाठलाग केला. तिला प्रेमाच्या जाळ्यात आढले. लग्नाचे आमिष दाखवून आराेपीने लातुरातील शासकीय काॅलनी येथील मित्राच्या खाेलीवर नेवून अत्याचार केले. माेबाइलद्वारे तिचे नग्न फाेटाे काढून ते साेशल मीडियात व्हायरल करण्याची वारंवार धमकी देत अत्याचार केले. पीडित मुलीच्या पालकांनी तिला मानसिक आधार, हिम्मत दिली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात पीडित मुलीच्या तक्रारीवरुन आराेपीविराेधात कलम ३७६, ३५४ भादंवि व ६६ (ई) आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास लातूर शहर उपविभागीय पाेलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी केला.
सरकारच्या पक्षाच्या वतीने न्यायालयात १७ साक्षीदारांची साक्ष झाली. पीडित फिर्यादी, पीडितेचे पालक, घटनास्थळावरील साक्षीदार, न्यायवैज्ञानिक प्रयाेगशाळेचे न्यायवैज्ञानिक अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी डीवायएसपी मंगेश चव्हाण, दिपरत्न गायकवाड यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. गुन्हा सिद्ध झाल्याने आराेपी समशेर सत्तार पठाण यास आराेपीविराेधात कलम ३७६ (२) (क) (न) भादंवि प्रमाणे दहा वर्ष सश्रम कारावास, ५० हजारांचा दंड, कलम ३५४ (सी) भादंवि प्रमाणे १ वर्षाचा सश्रम कारावास व २५ हजारांचा दंड, आणि ६६ (ई) आयटी कायद्याप्रमाणे १ वर्षाचा सश्रम कारावास आणि २५ हजारांचा दंड अशी शिक्षा लातूर न्यायालयाने बुधवारी सुनावली.
या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील संजय मुंदडा यांनी काम पाहिले. त्यांना वकील अक्रम काझी, एमआयडीसी ठाण्याचे पाेउपनि. एस.एम. चाैंडीकर यांनी सहकार्य केले.