ट्रॅक्टर चोरणाऱ्याला एकाला लातुरात अटक
By राजकुमार जोंधळे | Published: June 24, 2024 08:28 PM2024-06-24T20:28:24+5:302024-06-24T20:30:13+5:30
स्थागुशाची कारवाई : साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त
राजकुमार जाेंधळे / लातूर : ट्रॅक्टरची चाेरी करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने साेमवारी ट्रॅक्टरसह अटक केली आहे. शिवाय, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ७ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी सांगितले, किल्लारी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतून ट्रॅक्टरची चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली हाेती. याप्रकरणी गुरनं. २४१/२०२४ कलम ३७९ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार आणि अप्पर पाेलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने चाेरट्यांचा शाेध सुरु केला.
पथकाला बखऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे दापेगाव (ता. औसा) येथे राहणारा सचिन श्रीहरी कावळे (वय ३१) आणि एक अल्पवयीन मुलगा लातुरातील बाभळगाव चौकातील सर्व्हिस रोडवरून चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरसह थांबले हाेते. दरम्यान, त्यांना तातडीने ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चाैकशी करण्यात आली असता, त्याने इतर एकाच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. चाेरलेले ट्रॅक्टर (किंमत ७ लाख ५० हजार रुपये) पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, माधव बिलापट्टे, विनोद चीलमे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, राजेश कंचे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, चालक नकुल पाटील यांच्या पथकाने केली.